ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा कहर, अनेक देशांच्या विमानसेवा स्थगित
Coronavirus New Strain : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने पुन्हा एकदा देशाच्या काही भागात कडक लॉकडाउन लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. नेदरलॅन्ड आणि बेल्जियम या देशांनी ब्रिटनसोबतच्या आपल्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत.
लंडन: कोरोना व्हारयसच्या नव्या स्ट्रेनमुळे ब्रिटनमध्ये हाहाकार माजला आहे. त्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडनसहित साउथ-ईस्ट इंग्लंडच्या अनेक भागात 30 डिसेंबर पर्यंत कडक लॉकडाउनची घोषणा केली आहे.
कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनच्या परिणाम ब्रिटनमध्ये दिसत असल्याचं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कबुल केलं आहे. त्यामुळे ख्रिसमसचा उत्सव तोंडावर असूनही कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. नेदरलॅन्डने सर्वप्रथम ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या आपल्या विमानसेवांना स्थगिती दिली. बेल्जिअमनेही अशाच प्रकारचा निर्णय घेत ब्रिटनमधील आपल्या सर्व विमानसेवा थांबवल्या आहेत.
ब्रिटनच्या या परिस्थितीवर जर्मनी लक्ष ठेवून असल्याचं जर्मनीच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलंय. सूत्रांच्या माहितीप्रमाणे जर्मनीही बेल्जियम आणि नेदरलॅन्ड प्रमाणे ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील आपल्या विमानसेवांना स्थगिती देण्याचा विचार करत आहे.
ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या स्ट्रेनची माहिती आम्ही घेत असून याबाबत अन्य युरोपियन देशांच्या संपर्कात असल्याचं जर्मनीच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. आतापर्यंत जर्मनीमध्ये या नव्या स्ट्रेनचा कोणताही रुग्ण सापडला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
लंडन आणि साउथ-ईस्टच्या काही भागात या नव्या स्ट्रेनचे रुग्ण सापडले असल्याचं ब्रिटनकडून सांगण्यात येतंय. हा नवा स्ट्रेन मूळच्या कोरोना व्हायरसपेक्षा 70 टक्के जास्त प्रभावित आहे. या लॉकडाउन दरम्यान लोकांनी आपल्या घरातून बाहेर पडू नये आणि इतर लोकांना भेटू नये असं आवाहन ब्रिटनने आपल्या नागरिकांना केलं आहे.
ब्रिटनमधील परिस्थिती लक्षात घेता या देशासोबतच्या विमानसेवा स्थगित केल्या असल्याचं बेल्जियमने सांगितलंय. बेल्जियमच्या या निर्णयाने विमानसेवा तसेच यूरोस्टार ट्रेन सेवांवरही परिणाम होणार आहे. बेल्जियम आणि नेदरलॅन्डच्या या निर्णयाचं अनुकरण इतर युरोपियन देशही करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि नव्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी फिरायला जायचं नियोजन करणाऱ्या लोकांच्या आनंदावर विरजन पडणार आहे.
गेल्या वर्षी याच काळाच्या दरम्यान कोरोना जगभर पसरायला सुरुवात झाली होती. नंतर युरोपात कोरोनाचा कहर झाला होता. त्यामुळे या वर्षी आधीच काळजी घेण्याकडे अनेक देशांचा कल आहे.