COVID-19 New Strain: नव्या कोरोना विषाणू संदर्भात WHO ब्रिटनच्या संपर्कात; लवकरचं चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने जगभरात खळबळ माजली आहे. हा विषाणू सुपर स्प्रेडर असल्याची माहिती ब्रिटनच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना (WHO) ब्रिटनच्या सातत्याने संपर्कात आहे.
ज्यूरिच - जगभरात कोरोना विषाणू संसर्ग हळूहळू आटोक्यात येत असतानाच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने खळबळ माजली आहे. हा नवीन विषाणू कोरोनाचे म्युटेशन असल्याचे सांगितले जात आहे. आता याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. डब्लूएचओचे (WHO) अधिकारी सातत्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांशी संपर्क साधत नवीन विषाणू संदर्भात माहिती घेत आहेत.
नवीन कोरोना विषाणूची माहिती समोर येताच बर्याच युरोपियन देशांनी युनायटेड किंगडमकडे जाण्यायेण्यावर निर्बंध घातले आहेत.
“आम्ही ब्रिटनच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. ते नवीन विषाणू संदर्भातील विश्लेषण आणि चालू असलेल्या संशोधनाची माहिती आम्हाला देत आहेत. यासंदर्भात आम्ही लोकांना अद्यायावत करत आहोत. आम्ही नवीन कोरोना विषयी जाणून घेत आहोत. लवकरच या व्हेरिएंटच्या वैशिष्ट्यांचे स्पष्ट चित्र असेल, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
नवीन कोरोना वेगाने पसरत आहे. त्यामुळे लोकांनी प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावे आणि प्रशासनाच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याचे आवाहन डब्ल्यूएचओने केलं आहे.
नवा विषाणू नियंत्रणाबाहेर : ब्रिटन
ब्रिटनच्या शासनाकडून व्हायरसचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तेथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी लागू केली आहे. शिवाय रविवारपासूनच ब्रिटनमध्ये सक्तीची टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनही लागू करण्यात आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, 'ब्रिटनमधील कोरोना व्हायरसच्या या नव्या प्रकाराची माहिती मिळताच यावर चर्चा करण्यासाठी आरोग्य सेवेतील डीजीएचएस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एक महत्त्वाची बैठक पार पडेल. भारतात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. रॉडरिको एच. ऑफ्रिन हेसुद्धा या बैठकीत सहभागी होण्याचा अंदाज आहे'.
- New COVID-19 strain | जनतेच्या आरोग्याशी तडजोड नको, बोरिस जॉन्सन यांचं निमंत्रण रद्द केलं पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण
- Coronavirus | ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; भारतीय आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक
- प्रतीक्षा संपली.. भारतात जानेवारीमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात होणार, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे संकेत