इंग्लंडहून पुण्यात आलेले 109 प्रवासी सापडेना, पुणे महापालिकेची पोलिसांकडे धाव
इंग्लंडहून 1 डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागत नसल्याने पुणे महापालिकेने आता शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे.
पुणे : पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. इंग्लंडवरून आलेल्या 542 प्रवाशांपैकी 109 प्रवाशांचा पत्ता आणि फोन नंबरप्रमाणे संपर्क होत नसल्याने एकच खळबळ उडाली आहे. ब्रिटनहून आलेल्या 542 प्रवाशांची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुणे पोलिसांना दिली असून त्यापैकी 109 जणांचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
इंग्लंडहून 1 डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागत नसल्याने पुणे महापालिकेने आता शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे. पुण्यात आलेल्या 542 प्रवाशांपैकी 109 प्रवाशांचे पत्ते व संपर्क क्रमांकाप्रमाणे शोध लागत नसल्याचे यात सांगण्यात आले आहे. पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी याबाबत पोलिसांना पत्र दिले आहे.
कोरोना नवीन विषाणू आढळून आल्याने राज्य शासनाने परदेशातून विशेषत: इंग्लंडहून 1 डिसेंबरपासून आलेल्या प्रवाशांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करावी व त्यांना कोरोनाची लक्षणे आढळली तर त्यांना इतरांपासून विलग करून लागलीच रूग्णालयात दाखल करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.
पुणे शहरात इंग्लंडहून थेट विमानसेवा नाही परंतु, मुंबईहून पुण्यात इंग्लंडहून आलेले 542 प्रवासी आले आहेत. त्यांचे संपर्क क्रमांक व पत्ते महापालिकेकडे संबंधित यंत्रणेने दिले होते, मात्र महापालिकेच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टीमला यातील 109 जणांचे पत्ते आढळून आलेले नाहीत. यामध्ये काहींचे चुकीचे पत्ते असून, त्यातील अनेकांचे संपर्क क्रमांकच नॉट रिचेबल लागत आहेत. यामुळे अखेर महापालिकेने अशा 109 जणांची यादी पुणे पोलिसांकडे दिली असून त्यांचा शोध करावा, अशी विनंती केली आहे. दरम्यान महापालिकेने यात जर कोणी पॉझिटिव्ह आले तर नायडू रुग्णालयात 50 बेड आणि 8 आयसीयू बेडसह एक संपूर्ण मजला आरक्षित केला आहे.