(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Outbreak : घाबरु नका, मार्गदर्शक सूचनांचं पालन करा : अदार पूनावाला
Coronavirus Outbreak : चीनमधील कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदार पूनावाला यांनी भाष्य करत भारतीयांना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन देखील केलं.
Coronavirus Outbreak : चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. चीनमधील कोविडची (Covid 19) वाढती रुग्णसंख्या ही जगाच्या चिंतेचा विषय बनला आहे. चीनमधील कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक आणि सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी भाष्य करत भारतीयांना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. भारताची उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्डमुळे घाबरण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं. सोबतच मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहन देखील केलं. याबाबत पूनावाला यांनी ट्वीट केलं आहे.
घाबरु नका, मार्गदर्शक सूचनांचं पालन करा : अदार पूनावाला
"चीनमधील कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या चिंताजनक आहेत. परंतु आपलं उत्कृष्ट लसीकरण मोहीम आणि ट्रॅक रेकॉर्ड पाहता घाबरण्याची गरज नाही. भारत सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आपण विश्वास ठेवून त्यांचं पालन केलं पाहिजे," असं अदार पूनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
The news of rising COVID cases coming out of China is concerning, we need not panic given our excellent vaccination coverage and track record. We must continue to trust and follow the guidelines set by the Government of India and @MoHFW_INDIA.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) December 21, 2022
देशात पुन्हा कोरोना निर्बंध? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
दरम्यान, चीन (China) तसंच ब्राझीलमध्ये ( Brazil ) पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार (Government of India) अलर्ट झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज (21 डिसेंबर) देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये इतर देशांतील कोविड 19 परिस्थितींचाही आढावा घेण्यात येईल. त्यानंतर देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर
कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने (Covid-19) डोकं वर काढलं आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. चीनमधील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून रुग्णालयात खाटा आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. चीनमधील बीजिंग, शांघाय, वुहान, ग्वांगझाऊ, झेंगझोऊ, चोंगकिंग आणि चेंगडू या शहरांमध्ये परिस्थिती अधिक भयावह होत आहे. कोरोनाची वाढती संख्या पाहता चीनमध्ये कोरोनामुळे मृतांचा आकडा लाखांवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ठरली सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने एप्रिल 2020 मध्ये कोरोना लसीच्या निर्मितीसाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत मिळून काम करण्याची घोषणा केली होती. भारतात जानेवारी 2021 मध्ये कोविशील्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी ठरली.