(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid 19 : चांगली बातमी! मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्णांची नोंद, 294 नवे कोरोना रुग्ण
Coronavirus in India : भारतात मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 294 नवे कोरोनाबाधित आढळले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : भारतात मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 294 नवे कोरोनाबाधित आढळले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही नवीन आकडेवारी जारी केली आहे. यानुसार, कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली आहे. देशात सध्या 6 हजार 209 उपचाराधीन कोरोना रुग्ण आहेत.
294 new Covid cases in India, tally rises to 4,46,69,715; death toll climbs to 5,30,591: health ministry
— Press Trust of India (@PTI_News) November 22, 2022
मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्णांची नोंद
देशात 2020 साली कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला. मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी 30 मार्च 2020 रोजी 227 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर जगभरासह देशातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. देशात लाखो नव्या रुग्णांची भर पडताना दिसत होती. आता हे प्रमाण फार कमी झालं असून कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे.
Active Covid cases in India decline from 6,402 to 6,209: health ministry
— Press Trust of India (@PTI_News) November 22, 2022
कोरोना संसर्गाचा वेग मंदावला
देशात 5 मे 2021 रोजी 24 तासांत सर्वात जास्त 4 लाख 12 हजार 431 कोरोना रुग्ण सापडले होते. त्यानंतर यावर्षी 20 जानेवारी 2022 रोजी एका दिवसात 3 लाख 47 हजार 254 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. आता हे प्रमाण 294 वर पोहोचलं आहे, ही फार मोठी दिलासादायक बाब आहे.
देशात सध्या 6209 सक्रिय रुग्ण
भारतात सध्या 6209 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. काल हे प्रमाण 6402 इतकं होतं. तर नवीन 294 रुग्णांसह देशातील आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 46 लाख 69 हजार 715 इतकी झाली आहे. यापैकी चार कोटीहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत पाच कोरोनाबाधितांच्या मृत्यूसह देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या 5 लाख 30 हजार 591 इतकी झाली आहे.