भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Yeola Vidhan Sabha Constituency : येवल्यात छगन भुजबळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाने माणिकराव शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) निकालात महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसलाय. निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर ईव्हीएमवर आरोप केलाय. तसेच फेर मतमोजणीची मागणी देखील जोर धरत आहेत. आता येवला विधानसभा मतदारसंघात (Yeola Assembly Constituency) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विरोधात निवडणूक लढलेले महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
येवल्यात छगन भुजबळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाने माणिकराव शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. छगन भुजबळ यांनी माणिकराव शिंदे यांचा 23 हजार मतांनी पराभव केला आहे. आता माणिकराव शिंदे यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत फेर मतमोजणीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.
ईव्हीएम तपासणीस मिळाली परवानगी
फेर मतमोजणी साठी लागणारी फी देखील माणिकराव शिंदे यांनी भरली आहे. बूथ नंबर 200 वर माणिकराव शिंदे यांना 69 मते पडली आहेत. त्या बुथवर किमान 200 मते मिळायला पाहिजे होती, अशी त्यांनी शंका उपस्थित केली आहे. दरम्यान, फेर मतमोजणी नाही मात्र 'ईव्हीएम तपासणी' करण्याची परवानगी त्यांना मिळाली आहे. आता ईव्हीएम तपासणीतून नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पारनेरमध्ये राणी लंकेंनीही फेर मतमोजणीसाठी अर्ज
दरम्यान, राज्यात EVM संदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. पारनेर मतदारसंघाच्या मविआ उमेदवार राणी लंके यांनी देखील EVM फेरतपासणीसाठी अर्ज केला आहे. 18 बूथसाठी त्यांनी 8 लाख 49 हजार 600 रुपये शुल्क भरले आहे. दरम्यान पारनेर मतदारसंघात महायुतीने तर निवडणुकीपूर्वी केवळ आठ दिवस उमेदवार दिला होता त्यांना कुणीही ओळखत देखील नव्हतं असं म्हणत हा विजय लोकशाहीचा नाही तर ईव्हीएम मशीनचा विजय आहे असं राणी लंके यांनी म्हटले आहे. तर राज्यातील अनेक मतदारसंघात झालेलं मतदान आणि मतमोजणी वेळी आलेले आकडे यात तफावत आहे. अनेक ठिकाणी तर विरोधकांचे बूथ देखील नव्हते त्या ठिकाणी त्यांना मताधिक्य मिळालं आहे. हे सर्व शंका घेण्यासारखं आहे, असे खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा