Covid Pandemic : कोविड काळात जन्मलेल्या बाळांना बोलण्यात अडचण, अभ्यासात समोर आलं 'हे' कारण
Child Born in Covid19 : कोविड काळात जन्मलेल्या बाळावर कोरोनाचा परिणाम झाल्याचं एका अभ्यासात आढळून आलं आहे. या अभ्यासानुसार, कोविड काळात जन्मलेलं बाळाचं संवाद कौशल्य ( Communication Skill ) खूपच कमकुवत होतं.
Coronavirus Effect : दोन वर्षाआधी जगासह देशभरात कोरोना विषाणूचा उद्रेक पाहायला मिळाला. प्रत्येक घरात कोरोनाचे रुग्ण दिसत होते. कोरोना आणि त्याच्या सबव्हेरियंट हजारो लोकांचे प्राण गेले. डेल्टा व्हेरियंटचा कहर पाहायला मिळाला. कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं. त्यामुळे अनेकजण एकटे राहायला शिकले. त्याचा दुष्परिणाम असा झाला की, काही लोक मानसिक आजारांच्या विळख्यात सापडले. पण कोरोना विषाणू ( Covid19 ) संदर्भातील आणखी एक धोकादायक बाब समोर आली आहे. कोरोना विषाणूचा लहान मुलांवर खूप वाईट परिणाम दिसत आहे. या विषाणूमुळे मुलांच्या संवाद कौशल्यावर ( Communication Skill ) परिणाम झाल्याचं आढळून आलं आहे.
संशोधकांनी गर्भवती महिला आणि तिच्या गर्भाच्या आरोग्यावर कोविड 19 विषाणूचा होणारा परिणाम याबाबत अभ्यास केला. ज्या अभ्यासामध्ये मुलाच्या न्यूरोडेव्हलपमेंटल स्थितीचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनात आढळलं की, कोरोना काळात जन्मलेल्या बाळामध्ये मज्जासंस्थेचा विकास संथपणे झाला. यामुळे कोविड काळात जन्मलेल्या बाळांमध्ये न्यूरोडेव्हलपमेंटल डिस ऑर्डर, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, बौद्धिक अपंगत्व आणि एकाग्रतेचा अभाव अशा समस्या आढळून आल्या. या संदर्भात 28 ऑक्टोबर रोजी जामा नेटवर्क ओपनमध्ये अभ्यासाचा एक अहवाल प्रकाशित झाला. यामध्ये कोविड 19 दरम्यान मुलांमध्ये झालेले बदल समोर आले आहेत.
419 नवजात मुलांवर अभ्यास
संशोधकांनी 419 नवजात बालकांच्या आरोग्या संदर्भात हा अभ्यास केला. या अभ्यासात असे दिसून आले की कोरोना काळात सात टक्के बाळांमध्ये मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाचा विकास संथगतीने सुरु होता. त्यामुळे त्यांची बोलण्याची क्षमता आणि हालचाल करण्याची क्षमता त्यांच्या वयातील इतर मुलांच्या तुलनेने कमी होती. SARS-CoV-2 विषाणूमुळे होणारे 12 टक्के गर्भांना न्यूरोडेव्हलपमेंटल डिस ऑर्डर होण्याचा धोका होता.
काय आहे याचं कारण?
संशोधकांना असे आढळून आले की, मुलांमध्ये संवादाच्या कमतरतेचे मुख्य कारण म्हणजे लहान मुले या काळात अधिक व्यक्तींच्या संपर्कात येऊ शकली नाहीत. कारण लॉकडाऊन किंवा कोरोनाचा धोका पाहता बहुतेक मुलं घरातच होती. शिवाय मुलं त्यांच्या वयातील इतर मुलांसोबतही संवाद साधू किंवा खेळू शकत नव्हती. संपर्काअभावी मुलांना संवाद क्षमता वाढवता आली नाही. त्यामुळे मुलांमध्ये बोलण्याची क्षमता कमकुवत होती.
काळजी करण्याची गरज नाही
या अभ्यासाशी संबंधित शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जर मुलांचे संवाद कौशल्य कमी असेल तर पालकांना घाबरण्याची गरज नाही. लहान वयात मुलांच्या मेंदूचा पूर्णपणे विकास होत नाही. मुलं जन्माला आल्यानंतरही त्यांचया मेंदूचा विकास होत असतो. त्यामुळे कोरोना सारख्या साथीच्या रोगामुळे निर्माण झालेल्या अडचणी असून असल्या तरीही पालक आपल्या मुलांना मदत करत त्यांचं संवाद कौशल्य वाढवू शकतात. त्यांना अधिक अॅक्टिव्ह करण्यासाठी प्रयत्न करु शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )