राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
आजचा दिवस लक्षात राहणारा आहे, बाबा आढाव प्रेरणा देणारे असून प्रेरणा कधी म्हातारी होऊ शकत नाही. हरलेल्यांना आणि जिंकलेल्यांना देखील या निकालावर विश्वास नाही.
पुणे : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेलं समाजसेवक बाबा आढाव यांचं उपोषण आज अखेर मागे घेण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन बाबा आढाव यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर, शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनीही त्यांची भेट घेतली. यावेळी, सर्वांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार, बाबा आढाव (Baba adhav) यांनी आपलं उपोषण सोडलं, पण त्यांचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुण्यातील फुले वाडा येथे सुरू असलेल्या आंदोलनास उद्धव ठाकरेंनी भेट देऊन राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन महायुती व केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केलं. तसेच, ईव्हीएमविरुद्ध आणि लोकशाही वाचविण्यासाठी आता मोठं आंदोलन उभारलं जाईल, असेही ठाकरेंनी म्हटले. यावेळी, नाव न घेता एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला.
आजचा दिवस लक्षात राहणारा आहे, बाबा आढाव प्रेरणा देणारे असून प्रेरणा कधी म्हातारी होऊ शकत नाही. हरलेल्यांना आणि जिंकलेल्यांना देखील या निकालावर विश्वास नाही. वणवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते, बाबा आढाव यांचं हे आंदोलन म्हणजे ती ठिणगी आहे. योजनांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकत घेतला. या घोळात एक मोठा विषय ईव्हीएमचा आहे. माझे मत कोठे जाते हे समजायला हवे, शेवटच्या एका तासात 76 लाख मतं का वाढली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी येथील आंदोलनातू विचारला. तसेच, एवढं राक्षसी बहुमत असून देखील महाराष्ट्रात आनंद का नाही. बहुमत मिळून देखील राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पूजा-अर्चा करण्यासाठी का जात आहेत. अमावस्येला पूजा अर्चा करण्यासाठी गेले, यावरुन त्यांची मानसिकता दिसून येते, असे म्हणत नाव न घेता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोलाही लगावला.
महाराष्ट्र लेचा पेचा नाही, आपला महाराष्ट्र देशाला दिशा देईल. महाविकास आघाडीतील शिवसेना , कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे आंदोलन पुढे नेतील. बाबा आढाव यांनी हे आंदोलन मागे घ्यावे, महाराष्ट्रात अशी आंदोलने सर्व ठिकाणी होतील, असेही ठाकरेंनी यावेळी म्हटलं. तर, हा स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे, इथे अदानीला येऊ देऊ नका, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी अदानींवर निशाणा साधला.
मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नाही, डॉक्टर घरी
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळगावी दरे या ठिकाणी मुक्कामी आहेत. सध्या त्यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे डॉक्टर त्यांना उपचार देण्यासाठी त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहेत. तर, मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्तेदेखील त्यांच्या मूळ दरे गावी पोहोचत आहेत. मात्र, बंगल्याच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असून मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्याने ते कोणालाही भेटणार नाहीत, असं सांगण्यात येत आहे.