लॉकडाऊन काळात 2 रुपये किलो दराने गहू, 3 रुपये किलोने तांदूळ मिळणार, केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
नागरिकांना दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ पुरवण्याची व्यवस्था करण्यास केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गरजू नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवी दिल्ली : देशभरात लॉकडाऊन झाल्यामुळे सर्वंसामान्य नागरिकांना अन्न-धान्य जीवनावश्यक साहित्य कसं मिळणार याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. यावर केंद्र सरकारने तोडगा काढला आहे. नागरिकांना दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ पुरवण्याची व्यवस्था करण्यास केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली आहे. त्यामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने एक लाख 80 हजार कोटी रुपयांची तरतूद यासाठी केली आहे. ही सगळी रक्कम राज्यांना पुढच्या 3 महिन्यांसाठी आगाऊ देण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात गरिबांचे हाल होऊ नयेत, यासाठी मोठं पाऊल केंद्र सरकारने उचललं आहे.
जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली राहतील. तसेच तीन महिन्याचं अन्न-धान्य नागरिकांना आधीच दिलं जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची काल घोषणा केली. म्हणजे 14 एप्रिलपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत सर्व आर्थिक व्यवहार बंद झाल्याने अनेकांचे हाल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्वस्त धान्य पुरवण्यात निर्णय घेतला.
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग गरजेची आहे. त्यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी घरी थांबा, हात वारंवार धुवा. सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा, असं आवाहन प्रकाश जावडेकर यांनी केलं.
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 116 वरून 122 झाली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत. मुंबई येथे 4 जण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर आता मुंबईत नव्याने 5 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे.
संबंधित बातम्या :- VIDEO | 'पप्पा, जाऊ नका, बाहेर कोरोना आहे' ड्युटीवर चाललेल्या पोलीस पित्याला चिमुकल्याची आर्त साद
- सरकारी रुग्णालयात मास्कचा तुटवडा; एक मास्क चार दिवस वापरण्याची डॉक्टरांवर नामुश्की
- Coronavirus | मास्क, हँड सॅनिटायझरच्या किमती केंद्र सरकारकडून निश्चित
- Coronavirus | कोरोना बाधितांना वाचवण्यासाठी महाराष्ट्रात पुरेशी व्हेंटिलेटर्स आहेत का?