coronavirus | मांजरालाही होऊ शकतो कोरोना : रिसर्च
काही दिवसांपूर्वी अमेरीकेतल्या झूमध्ये वाघाला कोरोनाचे संक्रमण झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता वाघाची मावशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आणि माणसाच्या अगदी जवळ वावरणाऱ्या मांजरीलाही कोरोनाची लागण होऊ शकते.
मुंबई : जगभरात कोराना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या जीवघेण्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत, शिवाय जनजागृती देखील केली जात आहे . मात्र, हा विषाणू केवळ मनुष्यामध्ये आढळतो का? की पाळीव प्राण्यांनी देखील त्याची लागण होते, त्यांच्याद्वारे देखील तो पसरु शकतो. याबाबत नवीन माहिती समोर येत आहे. मांजर नवीन कोरोना म्हणजेच कोविड-19 ने संक्रमित होऊ शकतो. जर्नल सायन्सच्या संकेतस्थळावर या बाबत अभ्यासलेला लेख प्रकाशित करण्यात आला आहे, ही माहिती रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थने दिली आहे. मात्र इतर माणसाळलेले प्राणी म्हणजे कुत्रा, कोंबड्या, डुक्कर आणि बदकं यांना कोरोनाची लागण होत नसल्याचेही या अभ्यासात आढळून आले आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतल्या प्राणी संग्रहालयात वाघाला कोरोनाचे संक्रमण झाल्याचे वृत्त समोर आले होते. वाघाला कोरोनाची लागण, त्याची देखरेख करणाऱ्या झू-कीपरकडूनच झाली होती. माणसापासून प्राण्याला कोरोनाची लागण होऊ शकते अशी ती पहिली घटना समोर आली होती. मात्र आता वाघाची मावशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आणि माणसाच्या अगदी जवळ वावरणाऱ्या मांजरीलाही कोरोनाची लागण होऊ शकते ही माहिती काळजी करण्यासारखी नक्कीच आहे.
जानेवारी, फेब्रुवारीत चीनमध्येच प्राण्यावर कोविड-19 चे परीक्षण केले असता मांजर हा माणसाळलेला प्राणी या व्हायरसने सहज संक्रमित होऊ शकतो. तर मांजराच्या पिल्लांवर या व्हायरसचा अधिक मोठ्या गंभीर स्वरुपात परिणाम होतो असे अभ्यासले गेले.
कोरोना लस तयार करण्याचे संशोधन सध्या अनेक देशांमध्ये युद्ध पातळीवर सुरु आहे. तशात माणसांआधी प्राण्यांवर या लसीचे परीक्षण करणं सुरु आहे. लसीच्या संशोधनाच्या दृष्टीने, मांजराला नवीन कोरोनाची लागण होणे याकडे एक महत्त्वाची बाब असे समजले जात आहे. माणूस आणि प्राणी यांच्यात कोरोनाचे संक्रमण होऊ शकतं का? या अभ्यासाकडे डब्लूएचओला जवळून लक्ष द्यावं लागणार आहे.
संबंधित बातम्या :
Tiger Infected By Corona | अमेरिकेत न्यूयॉर्कच्या प्राणीसंग्रहालयातील वाघीण कोरोना बाधित!