(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नितीश कुमारांची एनडीएच्या नेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता; भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचीही आज बैठक
यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने 74 जागांवर विजय मिळवला आहे. तर जेडीयूला मात्र या निवडणुकांमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही. जेडीयूच्या जागांमध्ये घट झाली असून जेडीयूने 43 जागांवर विजय मिळवला आहे.
पाटणा : बिहारमध्ये आज एनडीएच्या आमदारांची संयुक्त बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नितीश कुमार यांची गठबंधनाचे नेते म्हणून निवड करण्यात येण्याची शक्यता आहे. बैठक दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी नितीश कुमार यांच्या घरी पर पडणार आहे. याआधी आज सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी भाजप ऑफिसमध्ये भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे.
पहिली बैठक सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी भाजपच्या ऑफिसमध्ये पार पडणार आहे. ज्यामध्ये पक्षाचे निवडून आलेले आमदार आपला नेता निवडणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एनडीएचे नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये एनडीएचे सर्व आमदार आपाल्या नेत्याची निवड करतील.
भाजपकडून 18 ते 20 आमदारांची मंत्रिपदासाठी वर्णी लागण्याची शक्यता
या दोन्ही बैठकांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. असं मानलं जात आहे की, एनडीएच्या याच बैठकीत नितीश कुमार यांची मुख्यमंत्री पदी निवड होण्याची शक्यता आहेत. त्यानंतर नितीश कुमार राज्यपालांसमोर सरकार स्थापन करण्यासाठी औपचारिक दावा सादर करतील.
यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने 74 जागांवर विजय मिळवला आहे. तर जेडीयूला मात्र या निवडणुकांमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही. जेडीयूच्या जागांमध्ये घट झाली असून जेडीयूने 43 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे असं मानलं जात आहे की, मंत्रिमंडळात भाजपचाच दबदबा असण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयूच्या पारड्यात 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या पारड्यात 18 ते 20 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.
सुशील मोदींना मिळू शकते नवी जबाबदारी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशील कुमार मोदींना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. असं सांगितलं जात आहे की, सुशील मोदी यांना दुसरी जबाबदारी देत. उपमुख्यमंत्री पदाचा मान एखाद्या दुसऱ्या नेत्याला दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे जेडीयूबाबत बोलायचं झालं तर त्यांचे आठ मंत्र्यांचा निवडणूकीत पराभव झाला आहे. त्यामुळे पक्षाला नव्या आमदारांचा विचार करावा लागणार आहे.
एकीकडे एनडीएमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत वेगाने हालचाली सुरु आहेत. तर दुसरीकडे विरोध पक्षांकडून अद्यापही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदापासून दूर राहण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. आरजेडीचं म्हणणं आहे की, बिहारच्या जनतेनं बदल घडवून आणण्यासाठी मतदान केलं आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी जनतेच्या आदेशाचा सन्मान करावा.
महत्त्वाच्या बातम्या :
- बिहार निवडणुकांच्या निकालानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदासंबंधी केलं मोठं वक्तव्य ; म्हणाले..
- Bihar Election | नितीश कुमार यांचा 16 नोव्हेंबरला शपथविधी? मंत्रिमंडळावर अद्याप निर्णय नाही
- नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आम्ही बिहारचा विकास करु : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- Bihar Election Results | बिहारमध्ये 'NOTA' ने बदलले सत्तेचे समिकरण, अनेक उमेदवार थोडक्यात पराभूत
- 'पंतप्रधानांवर बिहारचा विश्वास आहे हे स्पष्ट झालं', एक जागा मिळूनही चिराग पासवान आनंदी