Bihar Election Results | बिहारमध्ये 'NOTA' ने बदलले सत्तेचे समिकरण, अनेक उमेदवार थोडक्यात पराभूत
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये सात लाखांवर मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला. अनेक पराभूत उमेदवारांना ज्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले आहे त्यापेक्षा जास्त मते नोटाला मिळाली आहेत.
नवी दिल्ली: नुकत्याच पार पाडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत तब्बल सात लाख मतदारांनी 'नोटा' चा पर्याय निवडला अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. बिहार निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील एनडीएला कौल दिला आहे. सत्तारुढ एनडीएने 243 सदस्यीय विधानसभेत 125 जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली आहे तर विरोधी पक्ष महागठबंधनने 110 जागांवर विजय मिळवला आहे. नितीश कुमार सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 7 लाख 6 हजार 252 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे. ही संख्या एकूण झालेल्या मतदानाच्या 1.7 टक्के इतकी आहे. ही मते कोणत्याही उमेदवाराच्या पारड्यात पडली नाहीत. तीन टप्प्यात झालेल्या या निवडणुकीत चार कोटी लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ही संख्या एकूण मतदारांच्या 57.07 इतकी आहे.
नोटाचा पर्याय 2013 सालापासून सुरु झाला ईव्हीएम मशिनचा वापर सुरु झाल्यापासून 2013 साली निवडणूक आयोगाने मतदारांना नोटाचा पर्याय उपलब्ध करुन दिला. व्होटिंग मशीनवर सर्वात शेवटी असणारा हा पर्याय सर्वोच्च न्यायालायाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगाने मतदारांना उपलब्ध करुन दिला होता.
त्याआधी मतदारांना कोणताही उमेदवार पसंत नसेल तर एक फॉर्म भरुन देण्याचा पर्याय होता. हा फॉर्म 49-O म्हणून ओळखला जायचा. परंतु असा फॉर्म भरुन देणे म्हणजे मतदाराच्या मतदानाच्या गोपनियतेचा भंग होत होता.
यादीतील उमेदवारांच्यापेक्षा नोटाचा पर्याय जर जास्त मतदारांनी निवडला तर त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक घ्यावी अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती. पण अशा प्रकारचे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगास देण्यास नकार दिला होता. बिहारमध्ये अनेक उमेदवारांचा पराभव जितक्या मतांनी झाला आहे त्यापेक्षा जास्त मते नोटाला मिळाल्याचे दिसून आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
'पंतप्रधानांवर बिहारचा विश्वास आहे हे स्पष्ट झालं', एक जागा मिळूनही चिराग पासवान आनंदी