(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bihar News: राबडीदेवींच्या इफ्तार पार्टीला मुख्यमंत्री नितीश कुमार यांची हजेरी, बिहारमध्ये राजकीय चर्चांना उधाण
राबडीदेवी यांनी आयोजीत केल्या इफ्तार पार्टीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हजेरी लावली. त्यामुळे या इफ्तार पार्टीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
Bihar News : पाटणामध्ये माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टीत सर्वांच आश्चर्याचा धक्का बसला. कारण या कार्यक्रमात खुद्द बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हजेरी लावली. त्यामुळे या इफ्तार पार्टीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. येणाऱ्या काळात बिहाराच्या राजकारणात काही मोठ्य घडामोडी घडणार का? याबाबत देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यांनी तर आम्हीच सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार हे राबडीदेवी यांनी आयोजीत केलेल्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिल्याने वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की बिहारमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे का? तर दुसरीकडे लालू प्रसाद यांचा मोटा मुलगा तेज प्रताप यादव यांनी दोन पावले पुढे जात नितीश कुमार हे राजदच्या इफ्तार पार्टीत सामील झाल्याबद्दल बिहारमध्ये सरकार स्थापनेचे भाकीत केले. आमच्यात गुप्त चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. बिहारमध्ये आम्ही सरकार स्थापन करु. याबाबत राजदच्या राज्यसभा खासदार मीसा भारती म्हणाल्या की, राजकारणात कोणत्याही गोष्टीचा अंदाज बांधणे फार कठीण असते.
या इफ्तार पार्टीला तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव, राबडी देवी, मिसा भारती हे सर्वजण नितीश कुमार यांच्यासोबत बसले होते. या मेजवानीला चिराग पासवान आणि मुकेश साहनीही पोहोचले होते. दरम्यान, याबाबत तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. मग ते भाजपचे असोत किंवा लोक जनशक्ती पार्टीचे. इफ्तार पार्टीला हजेरी लावण्याची परंपरा असल्याचे ते म्हणाले. अशाप्रकारे इफ्तारच्या निमित्ताने राजदने मोठा राजकीय मेळावा आयोजित केला होता.
दरम्यान, नितीश कुमार यांच्या इफ्तार पार्टीला जाण्याचा राजकीय अर्थ काढू नये, असे भाजपने म्हटले आहे. बिहारचे उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन म्हणाले की, तेजस्वी यादव यांनी आम्हालाही इफ्तार पार्टीला बोलावले होते. आम्हीही आलो होते. यामध्ये कोणताही राजकीय मुद्दा बाहेर काढण्याची गरज नाही. मात्र, या इफ्तार पार्टीची वेळ सर्वात महत्त्वाची आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या बिहार दौऱ्याच्या पूर्वसंध्येला हा राजकीय मेळावा झाला. त्यामुळे त्यात नक्कीच राजकीय संदेश दडलेला आहे. दरम्यान, जनता दल आणि भाजपमध्ये सुरु धुसफूस सुरु आहे. त्यामुले आता बिहारमध्ये नवी राजकीय समीकरणे तयार होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: