Swati Maliwal Case: स्वाती मालीवाल यांच्याविरोधात विभव कुमार यांच्याकडून तक्रार दाखल; आरडाओरडा करुन अपशब्द उच्चारल्याचा आरोप
Swati Maliwal Case : मालीवाल यांनी 13 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा भंग करून अनधिकृत प्रवेश करून तिथे गोंधळ घातल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.
Swati Maliwal Case : नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांचे स्वीय्य सहाय्यक विभव कुमार (Bibhav Kumar) यांनी शुक्रवारी (17 मे) आप खासदार स्वाती मालीवाल (AAP MP Swati Maliwal) यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. मालीवाल यांनी 13 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा भंग करून अनधिकृत प्रवेश करून तिथे गोंधळ घातल्याचा आरोप करत त्यांनी तक्रारीत केला आहे. स्वाती मालीवाल मुख्यमंत्री केजरीवाल यांना भेटायला गेल्या असताना विभव कुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांना मारहाण केल्याचा आरोप खोटा असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. विभव कुमार यांनी तक्रारीची एक प्रत डीसीपी (उत्तर) यांनाही पाठवली आहे.
8:40 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या मालीवाल
विभव कुमार यांनी सांगितलं की, स्वाती मालीवाल 13 मे रोजी सकाळी 8:40 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उपस्थित असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यानं त्यांना त्यांची ओळख विचारली. त्यावर मालीवाल यांनी सांगितलं की, त्या राज्यसभेच्या खासदार आहे. स्वाती मालीवाल म्हणाल्या की, मला आतमध्ये जाऊ द्यावं, माझी मुख्यमंत्र्यांसोबत अपॉइंटमेंट आहे. यानंतर स्वाती मालीवाल यांनी जबरदस्तीनं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी प्रवेश केला.
"वाट पाहायला सांगितल्यावर त्या आरडाओरडा करू लागल्या"
विभव कुमार यांनी तक्रारीत पुढे म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी खासदार स्वाती मालीवाल यांना वेटिंग एरियामध्ये थांबण्यास सांगितलं. हा वेटिंग एरिया मुख्यमंत्री निवास संकुलातच आहे. पण, मुख्यमंत्री राहत असलेल्या मुख्य इमारतीत नाही. मालीवाल यांना मुख्यमंत्री निवासाच्या मुख्य इमारतीबाहेर थांबण्यास सांगितल्यानंतर त्यांनी आरडाओरडा सुरू केला. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी अपशब्दही वापरले. 9 वाजण्याच्या सुमारास सीएम ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतल्यानंतरही त्या वेटिंग एरिया सोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य इमारतीत पोहोचल्या.
"तुम्हारी औकात क्या है?..."
विभव कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "सकाळी 9.22 च्या सुमारास तक्रारदार (विभव कुमार) मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य इमारतीत पोहोचले, जिथे त्यांना स्वाती मालीवाल ड्रॉईंग रूममध्ये बसलेल्या दिसल्या. तक्रारदार त्यांच्याकडे गेले आणि त्यांची विनम्रपणे विचारपूस केली. तसेच, त्यानंतर विभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी योग्य प्रक्रिया अवलंबण्याचं आवाहन केलं. यावर स्वाती मालीवाल आरडाओरडा करू लागल्या. तसेच, त्यांनी अपशब्द उच्चारण्यास सुरुवात केली. स्वाती मालीवाल म्हणाल्या की, "तुम्हारी हिम्मत कैसे हुई...एक एमपी को रोकेन की...तुम्हारी औकात क्या है?"