एक्स्प्लोर
Advertisement
आमच्यात हिंमत असल्याने NRC ची अंमलबजावणी करतोय : शाह
चर्चेदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विधानानंतर सभागृहात जोरदार गदारोळ झाला.
नवी दिल्ली : आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (NRC) दुसरा मसुदा सोमवारी (29 जुलै) जारी करण्यात आला. यानंतर या मुद्द्यावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. आज या मुदद्यावर राज्यसभेत चर्चा झाली आणि जोरदार गोंधळही झाला. चर्चेदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विधानानंतर सभागृहात जोरदार गदारोळ झाला. आसाममध्ये हे आधीच लागू व्हायला हवं होतं, पण तुमच्यात ते लागू करण्याची हिंमत नव्हती, असं अमित शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले की, "सर्व विरोधी नेत्यांचं म्हणणं मी लक्ष देऊन ऐकलं. मी संपूर्ण भाषण ऐकत होतो, पण कोणी हे सांगितलं नाही की एनआरसी का आलं? आसाममध्ये याबाबत अनेक मोठी आंदोलनं झाली. अनेकांनी आपला जीवही दिला. यानंतर 14 ऑगस्ट 1985 रोजी राजीव गांधींनी आसाम करार केला होता."
आम्ही हिंमत दाखवली
शाह म्हणाले की, "आसाममध्ये एनआरीसी लागू करण्याची हिंमत काँग्रेसकडे नव्हती आणि भाजप सरकारने हिंमत दाखवून हे काम केलं आहे. काँग्रेस एनआरसीला विरोध करुन देशात अवैधरित्या राहत असलेल्या बांगलादेशींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे." शाह यांच्या विधानावर विरोधक खासदारांनी जोरदार गोंधळ केला, यानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं.
राजीव गांधींनी करार केला
राज्यसभेत अमित शाह म्हणाले की, "चर्चेदरम्यान हे कोणीच सांगत नाही की, एनआरसीचं मूळ कुठे आहे, हे कुठून आलं आहे? अवैध घुसखोरांच्या मुद्द्यावर आसामचे शेकडो तरुण शहीद झाले आहेत. 14 ऑगस्ट 1985 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आसाम अकॉर्डवर स्वाक्षरी केली होती. एनआरसीची स्थापना हाच आत्मा होता. या अकॉर्डची तरतूद होती की, अवैध घुसखोरांची ओळख पटवून, त्यांना नोंदणी नागरिकांमधून वेगळं करुन एक राष्ट्रीय नोंदणी बनवण्यात येईल," असं शाह म्हणाले.
काँग्रेसला बांगलादेशींबद्दल सहानुभूती
काँग्रेसला अवैध बांगलादेशींबाबत सहानुभूती असल्याचा आरोप करत अमित शाह म्हणाले की, "काँग्रेसच्या पंतप्रधानाने हा करार केला होता, पण त्या पक्षाला त्याची अंमलबजावणी करता आली नाही. आमच्यामध्ये हिंमत होती, त्यामुळे आम्ही अंमलबजावणी केली. तुम्हाला अवैध घुसखोरांना वाचवायचं आहे का?"
राज्यसभेत जोरदार गोंधळ
अमित शाह यांच्या या विधानानंतर राज्यसभेत जोरदार गोंधळ झाला. आरडाओरडा करत काँग्रेस खासदार सभापतींजवळ पोहोचले. यानंतर सभापतींनी राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 10 मिनिटांसाठी स्थगित केली. पुन्हा कामकाज सुरु होताच, काँग्रेस सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. यानंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
एनआरसीचा अहवाल
NRC च्या मते आसामचे 2 कोटी 89 लाख 83 हजार 668 भारतीय आहेत. आसामची एकूण लोकसंख्या 3 कोटी 29 लाख इतकी आहे. मात्र आता 40 लाख नागरिकांना आसाममधील आपलं नागरिकत्व सिद्ध करता आलं नाही.
NRC ची पहिली यादी 31 डिसेंबर 2017 रोजी जारी करण्यात आली होती. पहिल्या यादीत आसामच्या 3.29 कोटी लोकसंख्येपैकी 1.90 कोटी नागरिकांना स्थान मिळालं होतं. जे नागरिक 25 मार्च 1971 पासून आसाममध्ये राहतात त्यांना या यादीत सरसकट सहभागी करुन घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement