Hurun India : सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत, अदानींच्या संपत्तीत रोज 1002 कोटींची भर
Hurun India Rich List : गेल्या वर्षी अंबानींच्या संपत्तीत (Mukesh Ambani) रोज 163 कोटींची तर गौतम अदानींच्या (Gautam Adani) संपत्तीत रोज 1002 कोटींची भर पडली आहे.
India's Top Richest List 2021 : कोरोना काळात देशातील सामान्य जनता रस्त्यावर आली असताना, भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा जबर फटका बसला असतानाही भारतीय श्रीमंतांच्या संपत्तीत मात्र लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. Hurun India ने नुकतेच जाहीर केलेल्या आशियातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे टॉपवर आहेत. विशेष म्हणजे मुकेश अंबानीनी सलग दहाव्या वर्षी या यादीत आपलं सर्वोच्च स्थान कायम ठेवलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) आहेत.
IIFL वेल्थ ह्युरन इंडियाने आशियातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये गौतम अदानींची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. रोजच्या कमाईच्या बाबतीत गौतम अदानींनी आता मुकेश अंबानीना मागे टाकल्याचं दिसतंय. गेल्या वर्षीच्या काळात रिलायन्सच्या मुकेश अंबानींची संपत्ती रोज 163 कोटी रुपयांनी वाढली तर गौतम अदानींची संपत्ती रोज 1002 कोटींनी वाढली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत अशा 1007 लोकांच्या यादीत 255 जण केवळ मुंबईतील असून 167 जण दिल्ली आणि 85 जण बंगळुरुमधील आहेत.
गौतम अदानींची संपत्ती गेल्या वर्षी 3,65,700 कोटी रुपयांनी वाढली आहे. अजूनही मुकेश अंबानींनी या यादीत आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. मुकेश अंबानी कुटुंब भारतातील सर्वाधिक श्रीमंत कुटुंब आहे. रिपोर्टच्या मते, मुकेश अंबानींची संपत्ती ही 7,18,000 कोटी इतकी असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये 9 टक्क्यांची वाढ झाली आहे.
गौतम अदानींची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 261 टक्क्यांनी वाढली आहे. अदानींची संपत्ती ही 1,40,200 कोटींवरुन 5,05,900 कोटींवर गेली आहे. गेल्या एकाच वर्षात त्यांच्या संपत्तीत 3,65,700 कोटींची भर पडली आहे.
आशियातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर एचसीएलचे शिव नाडर आहेत. त्यांची संपत्ती 67 टक्यांनी वाढली असून ती 2,23,600 कोटी इतकी झाली आहे.
महिला उद्योगपतींचा विचार करता गोदरेज ग्रुपच्या तिसऱ्या पीढीतील सदस्या स्मिता व्ही कृष्ण या सर्वात वरच्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती 31,300 कोटी इतकी आहे. दुसऱ्या स्थानी किरण मुजुमदार शॉ आहेत. त्यांची संपत्ती 28,200 कोटी रुपये इतकी आहे.