सावरकरांच्या माफीबाबत न केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना खासदार लक्ष्य
सावरकर (veer savarkar) हे व्यक्तिमत्व सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलंच संवेदनशील बनलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावावरुन सतत राजकीय वाद सुरु असतात.
नवी दिल्ली : राज्यसभेत 12 खासदारांच्या निलंबनावरुन सावरकरांबाबत एक वक्तव्य झालं आणि इकडे महाराष्ट्रात भाजपनं शिवसेना खासदारांवर टीकास्त्र सोडलं. पण मुळात सावरकरांबद्दलचं हे वक्तव्य शिवसेना नव्हे तर केरळमधल्या माकप खासदारांनी केलेलं होतं. त्यामुळे एकाने केलेल्या वक्तव्यावरुनच राजकीय लढाई रंगवण्याचा प्रयत्न झाला.
सावरकर हे व्यक्तिमत्व सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलंच संवेदनशील बनलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावावरुन सतत राजकीय वाद सुरु असतात. आता तर थेट संसदेतल्या 12 आमदारांच्या निलंबनातही सावरकर आलेत. ते कसे, कुठून आले आणि खरंच त्यांचा शिवसेनेशी काही संबंध आहे का याची पुरेशी माहिती न घेता भाजपकडून आरोप प्रत्यारोपही सुरु झाले.
पण मुळात झालं काय होतं, खरंच प्रियंका चतुर्वेदी यांनी सावरकरांबद्दल हे विधान केलं होतं की नाही? तर प्रियंका चतुर्वैदी असं बोलल्याच नव्हत्या. 12 निलंबित खासदारांपैकी केरळमधले माकपचे खासदार विनय विक्रम यांनी हे विधान केलं होतं. त्यामुळेच आता या न केलेल्या विधानावरुन स्पष्टीकरण देण्याची वेळ शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर आलीय. शिवाय चुकीचे आरोप केल्यानं आशिष शेलार यांनी आता माफी मागावी असंही प्रत्युत्तर त्यांनी दिलंय.
एका इंग्रजी वेबपोर्टलनं केलेल्या स्टोरीचा आधार घेत हे आरोप सुरु झाले. पण मुळात त्या इंग्रजी वेबपोर्टलच्या स्टोरीतही कुठेच प्रियंका चतुर्वेदी यांनी हे वक्तव्याचा केल्याचा उल्लेख नाही. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. या खासदारांनी माफी मागितली तर निलंबन मागे घेऊ असं राज्यसभेत सभागृह नेते पीयुष गोयल यांनी म्हटलं. पण शिवसेनेसह सर्वच पक्षांनी माफीला स्पष्ट नकार दिलाय.
निलंबनाच्या या कारवाईत सावरकर म्हटल्याबरोबर भाजप शिवसेनेवर तातडीनं टीकेला सरसावली. पण हे एकाने केलेल्या वक्तव्यावरुनचं महाभारत. ज्यांनी हे विधान केलं त्या माकपवर शरसंधान करण्याऐवजी भाजप नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत असली तरी शिवसेना आपलं सावरकरप्रेम कायमच आक्रमकपणे दाखवत आली आहे.
Swatantrya Veer Savarkar यांची बदनामी करण्यात आलीय यात तथ्य; लेखक वैभव पुरंदरे 'माझा'वर
संबंधित बातम्या :