(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सावरकरांच्या दया याचिकेशी गांधींचा काय संबंध?
विनायक दामोदर सावरकर (veer savarkar) भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं हे व्यक्तिमत्व पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं एक वक्तव्य यावेळी कारण ठरलं आहे.
नवी दिल्ली : सावरकरांची (veer savarkar) दया याचिका (Mercy Petition) हा गेल्या काही वर्षांपासून भारतीय राजकारणात सातत्यानं गाजणारा विषय आहे. केंद्रीय राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानं या विषयाला एक अत्यंत नवं आणि आश्चर्यकारी वळण मिळालं आहे. गांधी आणि सावरकर ही दोन टोकं या नव्या वादात एकत्र जोडण्याचाही प्रयत्न झाला आहे.
विनायक दामोदर सावरकर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं हे व्यक्तिमत्व पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं एक वक्तव्य यावेळी कारण ठरलं आहे. महात्मा गांधींनीच सावरकरांना दया याचिका दाखल करायला सांगितले होते असं वक्तव्य राजनाथ यांनी केलंय. सावरकरांवरच्या एका पुस्तकाचं प्रकाशन काल दिल्लीत झालं, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
महात्मा गांधींच्या सूचनेवरून स्वातंत्र्यवीर सावरकरांची ब्रिटीशांकडे दया याचिका : केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह
सावरकरांनी ब्रिटीशांकडे माफी मागितली की नाही यावर अनेकदा वाद होतो. राजनाथ सिंह यांचं सध्याचं वक्तव्य हे दया याचिकेबद्दलचं आहे. पण ही दया याचिकाही त्यांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरुनच केली होती का या प्रश्नाच्या उत्तरासाठी काही तथ्यांकडे नजर टाकावी लागेल.
सावरकरांच्या दया याचिकेशी महात्मा गांधींचा काय संबंध?
- महात्मा गांधी हे आफ्रिकेतून भारतात 9 जानेवारी 1915 रोजी ते परतले
- सावरकरांना जेल झाल्यानंतर 1911 मध्येच त्यांची पहिली दया याचिका दाखल केली होती
- त्यानंतर 1913, 1915 मध्ये पुन्हा दया याचिका करण्यात आली होती.
- 1920 मध्ये भारतीय राजकारणात गांधी युगाचा आरंभ होऊ लागला होता, तेव्हा नारायणराव सावरकर हे स्वत: आपल्या भावाच्या सुटकेसाठी गांधींकडे विनंती करायला गेले.
- 18 जानेवारी 1920 मध्ये त्यांनी गांधींना याबाबत पत्र लिहिलं, त्यानंतर एकाच आठवड्यात 25 जानेवारी 1920 ला गांधींनी उत्तर दिलं.
- आत्ता तुम्हाला सल्ला देणं अवघड आहे. पण तुमच्या बंधुंवरचे आरोप केवळ राजकीय आहेत हे सांगत सगळी वस्तुस्थिती सांगणारी एक सविस्तर याचिका तुम्ही करा असं गांधींनी उत्तरात म्हटलं.
- याच पत्रावरुन आणि नंतरच्या सहा महिन्यातच म्हणजे मे 1920 च्या यंग इंडियात मासिकात गांधीनी जे लिहिलं त्यावर राजनाथ यांचा दावा आधारित आहे.
महात्मा गांधींनी सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले असं म्हणणं आणि महात्मा गांधींनीच सावरकरांना दया याचिका लिहायला सांगितली असं म्हणणं यात फरक आहे. शिवाय दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एकतर नारायणराव हे महात्मा गांधींकडे 2020 मध्ये विनंतीसाठी पोहचले, त्याआधीच दया याचिकेचे तीन प्रयत्न झाले होते. विक्रम संपथ यांनी सावरकरांवर लिहिलेल्या पुस्तकातच महात्मा गांधींच्या या पत्रव्यवहाराचा आणि यंग इंडियातल्या त्यांच्या लेखाचा समावेश आहे.
'यंग इंडिया'त सावरकरांबद्दल काय लिहितात महात्मा गांधी?
सावरकरांना कैदेत ठेवणं कसं चूक आहे याबद्दल महात्मा गांधींनी या लेखात लिहिलं आहे. या दोन बंधुंनी त्यांचे राजकीय विचार स्पष्ट केले असून दोघांनीही आपण क्रांतीकारी विचारांचं समर्थन करत नसल्याचं लिहून दिलं आहे. सुटकेनंतर रिफॉर्म अॅक्टनुसार आपण ब्रिटीश सरकारला सहकार्यच करु असं म्हटलं आहे. यानंतरही ब्रिटीश सरकार त्यांची सुटका करत नसेल तर काय? सावरकर आणि गांधी हे राजकीय विचारांची दोन टोकं..पण आता याच टोकांना एका दया याचिकेच्या प्रकरणा एकत्र गुंतलं जातंय हे विशेष.