चार महिन्यात गगनचुंबी राम मंदिर उभारणार : अमित शाह
मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये भाजपच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर बनायला हवं. परंतु काँग्रेसचे वकील कपिल सिब्बल म्हणतात की, अयोध्येत राम मंदिर बांधलं जाऊ नये. सिब्बलभाई तुमच्यात जितका दम असेल तो पणाला लावा आणि आम्हाला रोखून दाखवा.
जबलपूर : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन (CAA) देशभरात गोंधळ सुरु आहे. भारतीय जनता पक्ष आणि एनडीएतील काही पक्ष त्याचे समर्थन करत आहेत. तर युपीएसह इतर विरोधी पक्ष CAA वर सातत्याने टीका करत आहेत. याचदरम्यान आज (12 जानेवारी) मध्य प्रदेशमध्ये झालेल्या भाजपच्या सभेत भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी CAA ला विरोध करणाऱ्यांवर सडकून टीका केली.
काँग्रेस खासदार राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अमित शाह यांच्या निशाण्यावर होते. शाह म्हणाले की, विरोधी पक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत लोकांचं लक्ष विचलित करत आहेत. सातत्याने सीएएबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. शाह यांनी यावेळी जवाहरलाल नेहरु विद्यापीठात सुरु असलेल्या गोंधळाबाबत आणि अयोध्येतील राम मंदिराबाबतही भाष्य केले.
शाह म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर बनायला हवं. परंतु काँग्रेसचे वकील कपिल सिब्बल म्हणतात की, अयोध्येत राम मंदिर बांधलं जाऊ नये. सिब्बलभाई तुमच्यात जितका दम असेल तो पणाला लावा आणि आम्हाला रोखून दाखवा. पण आम्ही अयोध्येत राम मंदिर बांधणारच. येत्या चार महिन्यांमध्ये अयोध्येत आम्ही एका गगनचुंबी राम मंदिराची निर्मिती करु.
जेएनयूबाबत बोलताना शाह म्हणाले की, जेएनयूमध्ये काही तरुणांनी देशविरोधी घोषणा दिल्या. 'भारत तेरे टुकडे हो एक हजार, इन्शाल्लाह इन्शाल्लाह'. अशा घोषणा दिल्या जात होत्या. या लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे. जो देशविरोधी घोषणा देईल, त्याचं स्थान हे तुरुंगात आहे.
सीएएबाबत लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देशभर जन जागरण अभियान राबवत आहोत. काँग्रेस पक्ष, केजरीवाल, ममता बॅनर्जी, कम्युनिस्ट लोक सीएएबाबत लोकांमध्ये संभ्रम पसरवत आहेत. त्यामुळे आम्हाला हे अभियान हाती घ्यावं लागलं आहे. शाह म्हणाले की, मी इथे सर्वांना सांगायला आलोय की, CAA मुळे कोणाचंही नागरिकत्व धोक्यात येणार नाही. कोणाचंही नागरिक्तव हिरावलं जाणार नाही. या कायद्यात केवळ नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. याद्वारे कोणाचंही नागरिकत्व हिरावणे शक्य नाही.