एक्स्प्लोर
विवाहित स्त्री-पुरुषाने 'लिव्ह इन'मध्ये राहणे बेकायदेशीर: अलाहाबाद हायकोर्ट

अलाहाबाद: आता कोणत्याही विवाहित स्त्री-पुरुषाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे कायद्याने गुन्हा ठरणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी विवाहित स्त्री किंवा पुरुषाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे म्हणजे, सामाजिक गुन्हा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही उच्च न्यायालायाने दिल्या आहेत. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, वैवाहिक जीवनात स्त्री अथवा पुरुषाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे म्हणजे, आपल्या जोडीदाराची फसवणुक असल्याचे निकाल पत्रात नमुद केले आहे. त्यामुळे अशा व्यक्तीच्या विरोधात गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली पाहिजे, असे सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका निकालामध्ये अविवाहित, घटस्फोटीत, विधवा अथवा विदूर व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाचा आधार घेत, कुसुमदेवी नावाच्या नवविवाहित महिलेने अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने तिची ही याचिका फेटाळून लावत तिला चांगलेच फटकारले आहे. कुसुम देवीचे लग्न 30 मे रोजी संजय कुमार या व्यक्तीसोबत झाले. पण लग्नपूर्वी ती एका व्यक्तीसोबत पाच वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहात होती. त्यामुळे लग्ननंतरही तिला आपल्या पतीसोबतच त्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची परवानगी मिळावी, यासाठी याचिका दाखल केली. तसेच सासरच्या कुटुंबीयांकडून जीविताला धोका असल्याने पोलीस संरक्षण दिले जावे, अशी मागणीही न्यायालयाकडे केली होती. पण न्यायालयाने कुसुम देवीची याचिका फेटाळून लावत, तिला खडसावले आहे. वैवाहीक जीवनात असूनही, इतर व्यक्तीसोबत संबंध प्रस्थापित करणे हे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच पाच वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या व्यक्ती सोबतच लग्न का केले नाही? असा सवालही कुसुम देवीला विचारला. दरम्यान, कुसुम आणि तिच्या प्रियकराविरोधात जर तिचा पती संजय कुमारने केस दाखल केली, तर त्या दोघांविरोधात गुन्हेगारी स्वरुपाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे असे मतही व्यक्त केले. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सुनीत कुमार यांच्या एक सदस्यीय खंडपीठासमोर सुरु होती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
विश्व
राजकारण
महाराष्ट्र























