Accident News : अपघातात अर्ध कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर, चौघांचा मृत्यू
अर्टिगा गाडीमधून आपापल्या घरी परतत असताना काळानं घाला घातला. गाडीचा पुरता चक्काचूर झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारचे काही भाग कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
Accident News : आज भारताची सकाळ एका हृदयद्रावक घटनेनं झाली. उत्तर प्रदेशातील इटावा येथे झालेल्या भीषण अपघातानं संपूर्ण देश हादरला आहे. अपघातात एक अख्खं कुटुंब संपलं आहे. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आणि गंभीर जखमी एकाच कुटुंबातील आहेत. हे सर्वजण अर्टिगा गाडीमधून आपापल्या घरी परतत होते. त्यानंतर त्यांची गाडी वाटेत उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. गाडीचा पुरता चक्काचूर झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारचे काही भाग कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
उत्तर प्रदेशातील इटावा येथे इकदिल पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 19 वर सकाळी 7 वाजता ही घटना घडली. इथे आग्रा-कानपूर महामार्गावर एर्टिगा गाडी उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कारमधील सातपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही एर्टिगा गाडी दिल्लीहून हमीरपूरच्या महोबाला जात होती. ड्रायव्हरला डुलकी लागल्यानं हा अपघात झाला. ड्रायव्हरच्या डोळ्यांवर झोप आली आणि कार रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तीन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर जखमींमध्ये एक महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.
गंभीर जखमी असल्यानं एक महिला आणि एका तरुणीला स्थानिक जिल्हा रुग्णालयातून सैफई वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातात जखमी झालेल्या मुलानं सांगितलं की, आम्ही ननिहालच्या दिशेनं जात होते. माझी आई आणि बहीण गंभीर जखमी झाले आहेत. आम्ही सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्या आहोत. दरम्यान, अपघातात अर्ध कुटुंब जागीच ठार झालं आहे. बचावलेला मुलगा गंभीर जखमी असून तोदेखील कुटुंबासोबत इर्टिगा गाडीतून प्रवास करत होता.
दरम्यान, अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा पुरता चक्काचूर झाला होता. गाडीतील मृतदेह बाहेर काढणंही कठीण झालं होतं. शेवटी बचाव पथकानं स्थानिकांच्या मदतीनं गाडीचे काही भाग कापून मृतदेह बाहेर काढले. मृतांच्या नातेवाईकांना अपघाताबाबत माहिती देण्यात आली आहे.