एका वर्षात 98 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या पण मोदी विश्व गुरु व्हायला चालले आहेत; मल्लिकार्जुन खरगेंची टीका
पेट्रोलवर सेस लावून केंद्राने 25 हजार कोटी रुपयांचा महसूल कमावला पण राज्यांना त्यातील काहीच दिलं नाही अशी टीका काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर केली.

मुंबई : काँग्रेसच्या योजनेमुळे देशातील 27 टक्के जनता गरिबीतून वरती आले तर मोदी यांच्यामुळे 23 टक्के जनता पुन्हा गरिबीत गेली आहे. त्यामुळे मोदी सरकार हे लोकांचे उत्पन्न घालवणारे सरकार आहे असा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. एका वर्षात देशातील 98 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत पण मोदी विश्व गुरु व्हायला चालले आहेत, पहिले तुम्ही देशाचे गुरु तरी बना अशीही टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "भाजप सरकारच्या धोरणांमुळे गरीब जनता मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहे. एकीकडे कोविडचं संकट आहे तर दुसरीकडे महागाईचा सामना लोकांना करावा लागतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की देशातील लोकांना सुखी ठेवणार आणि याच मुद्यावर त्यांनी मतं घेतली होती. आता ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत."
मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणाले की, "देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. पेट्रोलच्या दरवाढीमुळे सामान्य जनता भरडली जात असून डिझेल दरवाढीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा होत आहे. आतंरराष्ट्रीय स्तरावर कच्या तेलाच्या किंमती उतरल्यानंतरही देशातील पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यात 38 वेळा हे दर वाढवण्यात आले आहेत."
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "केंद्र सरकार इंधनांच्या किंमतीवर सेस लावत आहे. तो कोणत्याही राज्याला मिळत नाही तर तो केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये जात आहे. पेट्रोलवरती कर लावून 25 लाख करोड रुपये केंद्र सरकारने कमवले आहेत. मात्र त्यातील महसूल कोणत्याही राज्याला दिला नाही. सिलेंडरवर मिळणारी सबसिडी तीन महिन्यापासून कोणाला मिळलेली नाही."
गेल्या सात महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. ते आंदोलन शेतकऱ्यांनी मागे घ्यावं यासाठी केंद्र सरकार कोणताही प्रयत्न करत नाही अशी टीका काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.
कोरोनामुळे देशात मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले आहेत. कोरोना रुग्णसंख्या, त्याच्यापासून झालेल्या मृत्यूचा डेटा केंद्र सरकारकडे नाही. याची सत्य माहिती समोर आली तर खरी परिस्थिती देशाला समजेल असं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
- Maharashtra Rain Update : पावसाचं धूमशान... राज्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती, पुरात अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करणं सुरु
- Maharashtra Rain : पावसाची जोरदार बॅटिंग! अनेक नद्यांना पूर, कोकणातील काही गावात पूरपरिस्थिती























