मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीत वाद आणि बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी दिल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत का? अशा अनेक चर्चांना उधाण आलं होतं. यावर स्पष्टीकरण देताना महाविकास आघाडीतील अनेक नेते महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, असं म्हणत होते. यामध्ये खुद्द नाना पटोले यांचाही समावेश होता. पण, नाना पटोले मतभेद नाहीत असं एकीकडे सांगत आहेत, तर दुसरीकडे मात्र अनेक वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. नाना पटोले यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळेही महाविकास आघाडीत मतभेद आहेत का?, असे प्रश्न निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही त्यांचा समाचार घेतला होता. लहान व्यक्तींवर मी बोलत नाही, असं भाष्यही शरद पवारांनी केलं होतं.
नाना पटोलेंचा गैरसमज झालाय : शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे
"नाना पटोले यांचा काहीतरी गैरसमज झालाय. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून दोन ते तीन वेळा स्वबळाचा नारा त्यांनी दिला. त्यावर आम्ही कोणीच काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. अद्यापही प्रतिक्रिया देण्यासारखं काहीच नाही. त्यांचा काहीही गैरसमज झाला असेल तर महाविका आघाडी सरकामधील तिनही पक्षांचे नेते खंबीर आहेत, तो दूर करण्यासाठी. तिघांमध्ये समन्वय आहे. मुख्यमंत्री सध्या कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्नशील आहेत." असं शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे बोलताना म्हणाल्या.
महाविकास आघाडीत काँग्रेस एकटी पडली : भाजप नेते प्रवीण दरेकर
"आपल्याच सहकाऱ्यावर अशा प्रकारची पाळत ठेवली जाते, असं स्वतः तिन पक्षांच्या सरकारमधील एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बोलतोय, हे महाविकास आघाडी सरकार म्हणून अत्यंत गंभीर आहे. तिन पक्षाच्या सरकारमध्ये आपापसातच सुसंवाद नसेल, समन्वय नसेल, तर राज्याच्या जनतेला आपण काय देणार आहोत, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सध्या राज्य एका वेगळ्या वळणावर आहे, असं मला वाटतंय. कारण नाना पटोलेंची अशी वक्तव्य दररोज येत आहेत. तसेच इतर मित्र पक्षांकडून त्यांना प्रत्युत्तरही दिलं जातंय. हे राज्याच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर आहे. कारण नाना पटोले सांगतात की, स्वबळाची भाषा केल्यापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरतेय, याचा अर्थ नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय की, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत. तसेच यापूर्वी त्यांच्या अनेक नेत्यांनी एकत्र निवडणूक लढवण्यासंदर्भात सूतोवाचही केलं आहेच. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस एकटी पडल्याचं दिसतंय.", असं प्रवीण दरेकर म्हणाले.
मित्रपक्षांचं काही माहित नाही पण आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली असून आमच्या मित्र पक्षांचं काय प्लानिंग आहे, याबद्दल मला कल्पना नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. नाना पटोलेंनी आपल्या या वक्तव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं तर दाखवून दिलं नाही ना? असा प्रश्न आता कार्यकर्त्यांना पडला होता. मात्र तिकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आघाडीसाठी प्रयत्न असल्याने आगामी काळात महाविकास आघाडीत ताण तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "ज्या काही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस स्वबळावर लढेल. ते आमचे मित्र पक्ष आहेत आणि मित्र पक्षांचं प्लानिंग वेगळं असेल, आम्ही काँग्रेस म्हणून आमची तयारी सुरु केली आहे. विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल, या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी सुरु झालेली आहे. राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष आहे, त्यामुळे बसून काय निर्णय होईल ते बघू. परंतु, आज आमच्या समोर त्यांचा कुठला प्रस्ताव नाही."