मोठी बातमी: पहिली ते पाचवीच्या मराठी अन् इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी असेल तृतीय भाषा; पहिलीपासूनच्या सक्तीचा निर्णय अखेर मागे
Mumbai News: राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार यापुढे इयत्ता 1 ली ते 5वी साठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल.

मुंबई: राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. शिवाय अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी (Marathi language) व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील. इयत्ता 6वी ते 10वी करिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल. असा भाषाविषयक धोरण या शीर्षकाखालील उपपरिच्छेदामध्ये नमूद करण्यात आले असून शासनाने हा निर्णय जारी केला आहे.
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय अखेर मागे
राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासूनच त्रिभाषा सूत्र स्वीकारले असून मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा ही हिंदी अनिवार्य, असा शासन निर्णय केला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसोबतच राज्य अभ्यासक्रम आराखडा नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू करताना मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर पालकांनी, राजकीय नेत्यांनी आणि शिक्षक संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला होता. याविरोधानंतर सरकारने बाजू मांडत शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय अखेर मागे घेत असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली होती. आता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून नवा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
इतर भाषा शिकण्यासाठी किमान 20 विद्यार्थ्यांची इच्छुकता असावी
यात सांगण्यात आले आहे की, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता 1ली ते 5वी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शविल्यास, त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास मान्यता देण्यात येईल. एकीकडे सरकारने अन्य भाषांचा पर्याय देण्याचा प्रयत्न करत नियम ही दिला आहे. इतर भाषा शिकण्यासाठी किमान 20 विद्यार्थ्यांची इच्छुकता असावी असे ही यात म्हटले आहे.
दरम्यान, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल. या कार्यवाहीसंबंधीचे सर्व नियोजन हे आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन, पुणे यांच्यास्तरावरून तात्काळ करण्यात येईल. मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांव्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील. इयत्ता 6वी ते 10वी करिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल. असेही सांगण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























