आयटी क्षेत्रातला सर्वांत मोठा आयपीओ येणार, लाखो रुपये कमवण्याची संधी गमवू नका!
सध्या भांडवली बाजारात अनेक कंपन्यांचे आयपीओ दाखल होत आहेत. गुंतवणूकदारांना या आयपीओच्या माध्यमातून चांगले पैसे कमवण्याची उत्तम संधी चालून आली आहे.
मुंबई : सध्याची शेअर बाजाराची (Share Market) स्थिती लक्षात घेता अनेक कंपन्या आपले आयपीओ घेऊन येत आहेत. आता लवकरच आयटी क्षेत्रातील मुंबईतील एक दिग्गज कंपनी आपला आयपीओ आणणार आहे. या कंपनीचे नाव हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज असे आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीने भांडवली बाजार नियामक सेबीकडे आयपीओच्या योजनेचा मसुदा (डीआरएचपी) सादर केला आहे. त्यामुळे लवकरच या कंपनीचा आयपीओ लॉन्च होणार आहे.
आयटी क्षेत्रातील सर्वांत मोठा आयपीओ
हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज या कंपनीचा हा आयपीओ साधारण 10 हजार कोटी रुपयांचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सेबीकडून या ड्राफ्टला मंजुरी मिळाल्यास या प्रस्तावित आयपीओच्या नावे एका नव्या विक्रमाची नोंद होईल. हा आयपीओ देशातील सर्वांत मोठ्या आयपीओंच्या रांगेत जाऊन बसणार आहे. हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज या आयपीओला सेबीने मंजुरी दिल्यास हा आयटी क्षेत्रातला आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ ठरणार आहे.
टीसीएसचा विक्रम मोडणार
देशांतर्गत भांडवली बाजारात आयटी क्षेत्रातील सर्वांत मोठा आयपीओ असण्याचा विक्रम सध्या टीसीएस या कंपनीच्या नावावर आहे. ही कंपनी टाटा उद्योग समुहाशी निगडीत आहे. टीसीएस ही भारतातील सर्वांत मोठी आयटी कंपनी आहे. टीसीएस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीने साधारण दोन दशकांपूर्वी 4,713 कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता. तर आता हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज या कंपनीचा आयपीओ हा 9,950 कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. म्हणजेच हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज या कंपनीचा आयपीओ हा टीसीएस कंपनीच्या आयपीओपेक्षा साधारण दोन पटीने मोठा असणार आहे.
2021 साली अधिग्रहण
हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज या कंपनीने आयपीओचे काम पाहण्यासाठी कोटक इन्वेस्टमेंट बँकिंग, सिटी ग्लोबल मार्केट्स, जेपी मॉर्गन, एसबीसी सिक्योरिटीज आणि आयआयएफएल सिक्योरिटीज यांना मॅनेजर म्हणून नियुक्त केलं आहे. अमेरिकेतील खासगी इक्विटी फर्म कालाईल ही या कंपनीची प्रमोटर आहे. कार्लाइल या फर्मने सन 2021 मध्ये हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज या कंपनीला बेअरिंग प्राइव्हेट इक्विटी एशिया (आता ईक्यूटी) या कंपनीकडून साधारण 3 अब्ज डॉलर्सना खरेदी केलं होतं.
हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज सध्या चर्चेत का आहे?
हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज या कंपनीचा आयपीओ येणार आहे, हे वृत्त आल्यापासून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण ही आयटी कंपनी याआधी शेअर बाजारावर सूचिबद्ध होती. साधारण दोन दशकांपूर्वी जून 2002 मध्ये ही कंपनी शेअर बाजरावर सूचिबद्ध झाली होती. मात्र साधारण चार वर्षांआधी या कंपनीला नंतर शेअर बाजारावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर आता ही कंपनी पुन्हा एकदा शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्यास तयार आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :