Pune Rain: पुणे जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस; धायरी, इंदापूरमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं, एनडीआरएफकडून 50-60 जणांची सुटका
Pune Rain News: पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये 50 घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरल्याची घटना घडली आहे. परिणामी एनडीआरएफच्या पथकाला या परिसरात पाचारण करण्यात आलंय

Pune Rain News Update : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. तर आज पहाटेपासून मुंबई, पुणेसह राज्यातील विविध भागात पावसाचा सरी कोसळत आहे. अशातच पुण्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळला असून अद्याप अधून मधून पावसाची रिपरीप सध्या सुरू आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये रात्री 8 ते 8.30 च्या सुमारास 50 घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरल्याची घटना घडली आहे. परिणामी एनडीआरएफच्या पथकाला या परिसरात पाचारण करण्यात आलं असून एनडीआरएफच्या जवानांनी सखल भागातील लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे.
थेऊरसह धायरी, इंदापूर परिसराला पावसाचा फटका, 50 ते 60 जणांची सुखरूप सुटका
भारतीय हवामान विभागाने पुणे आणि घाटमाथा परिसराला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर पुण्यासह ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र आहे. या पावसाचा फाटक थेऊरसह धायरी आणि इंदापूर परिसरातील सखल भागात बसला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्याचे चित्र आहे. एनडीआरएफच्या पथकाने या परिसरातील 50 ते 60 जणांची सुखरूप सुटका केली आहे. तर इंदापूर तालुक्यातील काझड येथील जोड कालवा फुटला असल्याची ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
खडकवासला धरणातून 14547 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार
दुसरीकडे, खडकवासला धरण साखळीत सुरु असलेल्या पावसामुळे सकाळी दहा वाजता मुठा नदीच्या पाआत्रात खडकवासला धरणातून 14547 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर वरसगाव आणि पानशेत धरणांमधुन देखील पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे भीडे पुल पाण्याखाली जाऊ शकतो.
मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा
हवामान खात्याने पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा (Weather Alert) दिला आहे. यासोबतच वाऱ्याचा वेग देखील 30-40 किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून यासंदर्भातील अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने आज सकाळी नवीन अलर्ट जारी केला. त्यानुसार मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.





















