एक्स्प्लोर
ग्रामदेवता : अकोल्याच्या बाळापूरचं आराध्यदैवत श्री बाळादेवी
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पुरातन आणि ऐतिहासिक असलेल्या बाळापुर शहराची बाजारपेठ कधीकाळी विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जायची. 80 टक्के मुस्लिमबहुल असलेल्या बाळापुरची ग्रामदेवता श्री बाळादेवी आहे. अतिशय पुरातन आणि ऐतिहासिक वारसा असणाऱ्या बाळापूर या शहराला या देवीच्या नावावरुनच नाव मिळालं आहे.
'मनकर्णिका' जी आता 'मन नदी' म्हणून ओळखली जाते आणि 'महेशा' नदी जी आता 'म्हस नदी' म्हणून ओळखली जाते, या दोन्ही नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी उंच टेकडीवर बाळादेवीचं सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात बाळादेवी मातेचा सुंदर असा मुखवटा अर्थातच विग्रह बसवलेला आहे. मुखवट्यावर दोनवेळा उगवत्या सुर्याची थेट किरणे पडतात. ही स्वयंभू देवी असल्याचं अभ्यासक सांगतात.
बाळादेवीनं या गावाचं आध्यात्मिक भावविश्व अतिशय समृद्ध केलं आहे. त्यामुळे गावातील भक्तांना देवीच्या दर्शनासाठी कोणत्या उत्सवाचं किंवा सणाचं कारण लागत नाही. त्यांची पावलं अगदी सहजच बाळादेवीकडे वळू लागतात.
श्री बाळादेवीची आख्यायिका
बाळादेवीचे हे मंदिर मुळात त्रिपुर सुंदरीचं पीठ आहे. 'श्रीयंत्रा'ची जी महती सांगितली जाते, त्यामध्ये श्रीयंत्राची देवता ही 'बाळात्रिपुरसुंदरी' आहे. श्रीयंत्राची उपासना करणे म्हणजेचं 'त्रिपुरसुंदरीची उपासना' करणे होय. अठरा पुराणातल्या ब्रम्हांड पुराणात 'ललिता पाठ्यायन' आहे. त्यामध्ये 'बाविसाव्या अध्यायात' बाळादेवीने 'भंडासुर' नामक दैत्य व त्याच्या तीस पुत्रांशी पराक्रमी संघर्ष करुन त्यांचा वध केल्याची कथा व महती वर्णन केली आहे. तसंच 'आगम ग्रंथात' बाळासहस्त्रनाम, श्री बाळा अष्टोत्तर शतनाम, श्री बाळाकवच, श्री बाळामकरंद स्तवन अशा स्तोत्रांचा उल्लेख आहे. त्यामुळेच या वारशाचा अभिमान देवीच्या प्रत्येक भक्ताला आहे.
बाळादेवीची यात्रा
बाळादेवीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी 55 पायऱ्या चढून जाव्या लागतात. पुर्वी हे मंदिर लाकडांच्या खांबावर उभं होतं. 1978 मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. नवरात्रोत्सवामध्ये 'बाळादेवी मंदिराला' यात्रेचं स्वरुप आलेलं असतं. अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. भजन, कीर्तन, गोंधळाचं आयोजनही करण्यात येतं. देवीची महापूजा आणि महाभिषेक करण्यात येतो. विजयादशमी दिवशी श्रींच्या पालखीचं सिमोल्लंघन करण्यात येतं. हा उत्सव पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते.
हिंदू-मुस्लीमांना एकत्र ठेवणारी देवता
इथल्या मुस्लीमांचाही बाळादेवीच्या अनेक उत्सवांमध्ये सहभाग असतो. त्यामुळे बाळादेवी या गावाला बंधुत्वाच्या एका अनोख्या नात्यात बांधणारी देवता असल्याचं येथील मुस्लीमांना वाटतं. भक्ती आणि उत्कटतेचं रुप म्हणजे बाळापुरची बाळादेवी. देवांच्या नावाने गावांना ओळख मिळाल्याची अनेक उदाहारणे देशात आणि राज्यात आहेत. बाळापुरची ओळख निर्माण झाली ती येथील बाळादेवीच्या शक्तीपीठानं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement