Shivshahi Bus Accident: शिवशाही बस अपघात प्रकरणी परिवहन विभागाची मोठी माहिती; निष्पापांचा बळी घेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
Gondia Shivshahi Bus Accident: गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी-डव्वाजवळ झालेला शिवशाही बसचा अपघात हा अतिवेग आणि चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने झालचे समोर आले आहे.
Gondia Shivshahi Bus Accident: गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी-डव्वाजवळ झालेला शिवशाही बसचा अपघात (Shivshahi Bus Accident) हा अतिवेग आणि चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने झालचे समोर आले आहे. या संदर्भात आरटीओने केलेल्या चौकशीअंती या अपघाताचे कारण निष्पन्न झाले आहे. नागपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ही बाब पुढे आली आहे. या अपघाताला बसचालकच कारणीभूत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक लावला. दरम्यान बसचा वेग जास्त असल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अणि बस उजवीकडून डावीकडे होत उलटली. आता या अपघाताची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली असुन सविस्तर अहवाल तयार करून तो परिवहन आयुक्त आणि पोलिस विभागाकडे सादर होणार आहे.
बस चालकाकडून पूर्वी 7 वेळा अपघात; चालकावर निलंबनाची कारवाई
दरम्यान, या प्रकरणी आता एसटी महामंडळाच्या भंडारा विभागीय अधिकाऱ्यांनी शिवशाही बस चालक प्रणय रायपुरकर याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. विभागीय वाहतूक अधिकारी शितल शिरसाट यांनी चालक प्रणय रायपूरकर याच्या निलंबनाचा आदेश काल(शनिवारी) रात्री काढला असून सध्या चालक प्रणय रायपूरकर हा डुग्गीपार पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील आदेशाप्रमाणे हे निलंबन राहणार असून या कालावधीत सदर चालक निलंबीत कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रावर दररोज स्वाक्षरी करणे त्याला बंधनकारक राहणार आहे. या अपघातास कारणीभूत ठरलेला चालक प्रणय रायपूरकर याच्या हातानं यापूर्वी सात किरकोळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पाच हजार रुपयांपेक्षा कमी नुकसानीचे हे सात अपघात घडल्याची माहिती एसटी महामंडळाच्या एका अधिकाऱ्यानं एबीपी माझाशी बोलताना दिली.
बस अपघातानंतर खासदार प्रशांत पडोळे ॲक्शन मोडवर
शिवशाही बसच्या अपघातात निष्पाप 11 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता भंडारा-गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पाटोळे हे ॲक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळालेत. आज त्यांनी भंडारा येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाला भेट देत बसची पाहणी केली. यांत्रिकी विभागात जाऊन कर्मचाऱ्यांची चर्चा केली. नागपूर विभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करताना बस प्रवाशांना चांगल्या सुविधा द्याव्यात आणि चालकांनी नियंत्रित वाहन चालवून प्रवाशांचा प्रवास सुखकर करावा, अशा सूचना दिल्यात. बस प्रवाशांना होणारा त्रास खपवून घेणार नाही, अशा सूचनावजा इशारा यावेळी खासदार पडोळे यांनी उपस्थित एसटी महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्यात.
कोंढ्यानं भरलेला ट्रक वैनगंगा नदीवर उलटला
अकोला इथून रायपुरकडं कोंढ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रक स्टेरिंग अँगल तुटल्यानं चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं. यामुळं ट्रक भंडारा येथील वैनगंगा नदीच्या पुलावर उलटला. परिणामी, ट्रकमधील कोंढ्याची पोती वैनगंगा नदीच्या पुलावर विखुरल्यानं नागपूर - कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी, चालक आणि वाहक किरकोळ जखमी झालेत. मात्र, अपघातग्रस्त ट्रक वैनगंगा नदीवर उलटल्यानं दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी ट्रक आणि त्यातील विखुरलेलं पोती बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केलेत.
हे ही वाचा