एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण सर्वाधिक! गोंदिया अपघातानंतर शिवशाहीच्या अवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
राज्यात एसटी महांडळाच्या ताफ्यात १५ हजार ६०० च्या जवळपास बसेस आहेत.त्यात ८९२ शिवशाही बसेसचा समावेश आहे.
Shivshahi Accident: शिवशाही बसचा पलटून अपघात, शिवशाहीचा ब्रेक फेल झाल्यानं बस उलटली अशा कित्येक बातम्या सतत कानावर पडत असताना गोंदिया जिल्ह्यात शिवशाही बसला झालेल्या भीषण अपघातामुळे शिवशाही बसच्या वाईट अवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस अपघातांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे शिवशाही बसेसचे असल्याचं समोर येत आहे.
वाईट अवस्थेत असतानाही महामंडळाकडून वातानुकूलितच्या नावाने सर्वाधिक प्रवासी भाडे आकारले जाते. राज्यात एसटी महांडळाच्या ताफ्यात १५ हजार ६०० च्या जवळपास बसेस आहेत.त्यात ८९२ शिवशाही बसेसचा समावेश आहे. महामंडळात गरजेच्या तुलनेत तांत्रिक कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. याचा शिवशाही बसेसच्या देखभाल दुरुस्तीवरही परिणाम होत आहे. इतर बसेसचा ६ लाख किमीमागे एक अपघात नोंदवला जात आहे. त्यामुळं आता शिवशाहीतून प्रवास करायचा की नाही असा प्रश्न प्रवाशांसमोर उभा राहिलाय.
एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण अधिक!
एसटी बसेस चे अपघाताचे प्रमाण 6 लाख किलोमीटर मागे एक अपघात एवढे असताना शिवशाही बसच्या अपघाताचे प्रमाण दर 3.50 लाख किलोमीटर मागे एक अपघात एवढे आहे. एसटीच्या अपघाताचं प्रमाण पाहता एसटीच्या इतर बसेसच्या तुलनेत शिवशाहीचे अपघात दुपटीने जास्त आहेत.यामागे देखभाल दुरुस्तीचा अभाव हे कारण समोर येत आहे. शिवशाहीची एकंदरीतच डिझाईन यासाठी कारणीभूत आहे का? याचा तपास होण्याचीही गरज असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणं महत्वाचं असल्याची मागणी होताना दिसत आहे.
गोंदियात शिवशाही बस उलटून भीषण अपघात
गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात (Gondia Shivshahi Bus Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सध्या बचाव कार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ आज दुपारी 1 च्या सुमारास नागपुरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस (Gondia Bus Accident) उलटली. या अपघातात 7-8 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला आदेश दिले आहेत.