(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gadchiroli News : गडचिरोलीत रानटी हत्तींचा धुमाकूळ, 14 घरे जमीनदोस्त, भीतीपोटी मुलाबाळांसह नागरिकांची धावाधाव
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील आंबेझरी इथे रानटी हत्तींनी 14 घरे जमीनदोस्त केली. 18 ते 20 हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने नागरिकांना मुलाबाळांसह जीवाच्या भीतीने घरे सोडून धावाधाव करावी लागली.
Gadchiroli News : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील आंबेझरी इथे रानटी हत्तींनी (Wild Elephant) 14 घरे जमीनदोस्त केली. 18 ते 20 हत्तींच्या (Elephant) कळपाने धुमाकूळ घातल्याने नागरिकांना मुलाबाळांसह जीवाच्या भीतीने घरे सोडून धावाधाव करावी लागली. या घटनेने या घरातील कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहेत.
पहाटे हत्तींच्या कळपांचा हल्ला, घरांची नासधूस, नागरिकांचा पळ
आंधळी (सोनपूर) गट ग्रामपंचायत अंतर्गत फक्त 36 कुटुंब असलेले आंबेझरी हे गाव डोंगर आणि घनदाट जंगलाने वेढलेले आहे. या आदिवासीबहुल गावात 2 ऑगस्ट रोजी पहाटे 18 ते 20 च्या संख्येत असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने हल्ला चढवला. घरांची नासधूस करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरलेल्या नागरिकांनी मुलाबाळांसह घरातून बाहेर पळ काढला. काही वेळानंतर स्वत:ला सावरत गावकऱ्यांनी टेंभे पेटवत हत्तीच्या कळपाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हत्तींनी गावकऱ्यांना दाद न देता धुडगूस सुरुच ठेवला.
ऐन पावसाळ्यात डोक्यावरचं छत गेलं, धान्याचीही नासाडी
माहिती मिळताच पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोडे यांनी गावात भेट दिली आणि पंचनामा केला. या हल्ल्यात अनेक घरांची पडझड झाली. संसारोपयोगी साहित्यासह धान्याचे नुकसान झाले. त्यामुळे येथील गरीब कुटुंबांना बेघर होण्याची वेळ ओढावली. अतिदुर्गम गाव असल्याने येथे चार ते सहा महिन्यांचे धान्य साठा करुन ठेवतात. मात्र, ऐन पावसाळ्यात डोक्यावरचे छत तर गेलेच पण वर्षभराच्या धान्याचीही नासाडी झाल्याने गावकरी संकटात सापडले आहेत. शासनाने अन्नधान्याची सोय करुन भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
कळपातून वेगळा झालेल्या 'त्या' हत्तीचा भरेगाव परिसरात धुमाकूळ
गेल्या सहा महिन्यांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये हत्तीचा कळप दाखल झालेला आहे. या हत्तीच्या कळपाचा गडचिरोली ते गोंदिया व गोंदिया ते गडचिरोली असा प्रवास सुरु असतो. मात्र या हत्तीच्या कळपातून एक हत्ती रस्ता भरकटल्याने सध्या तो देवरी तालुक्यातील भरेगाव परिसरामध्ये आहे. या हत्तीने भरेगाव परिसरात धुमाकूळ घातला. 31 जुलै रोजी सायंकाळी या हत्तीचे दर्शन नागरिकांना झाले. तर उर्वरीत हत्तीचा कळप सध्या गडचिरोली जिल्ह्यातील वडसा परिसरामध्ये आहे. या भरकटलेल्या हत्तीची हुल्लडबाजी करु नये असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. वनविभागाची एक टीम या हत्तीवर पाळत ठेवून आहे.
हेही वाचा