(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गडचिरोलीत लोहखनिज वाहतुकीमुळे आठवड्याभरात पाच जणांचा मृत्यू, अहेरीत तणाव; नागरिकांकडून बंदची हाक
दुचाकीला येलचीलजवळ ट्रकने धडक दिल्याने तो जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अहेरी परिसरात तणाव असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत बंदची हाक दिली आहे.
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सूरजागड (Surajagad) टेकडीवरील लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आठवडाभरात या अपघातात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. मंगळवारी दुपारच्या सुमारास अहेरी येथील युवक सचिन नागुलवार (29) याच्या दुचाकीला येलचील जवळ ट्रकने धडक दिल्याने तो जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अहेरी परिसरात तणाव असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत बंदची हाक दिली आहे.
सूरजागड लोहखनिज प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रशासनाकडून विकास आणि रोजगाराचे मोठ मोठे दावे केल्या जात आहे. मात्र, या खनिजाच्या वाहतुकीसाठी लागणारी पायाभूत सुविधा अद्याप निर्माण न केल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आठवडाभरात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाने धडक दिल्याने पाच जणांना जीव गमावावा लागला. यातील सर्वच मृत तरुण असल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. 2022 मध्ये राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाला होणारा विरोध मोडून काढून हा प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पापासून सरकारने 450 कोटींचा महसूल मिळाल्याचा दावा सरकारकडून केला जातो.
सुरजागड टेकडीवर लोहखनिजाचे साठे
गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर लोहखनिज साठे आहेत. अनेक वर्षे पुरेल इतका लोहखनिज साठा इथे आहेत. घनदाट जंगलाचा हा भाग असल्याने पर्यावरणवादी आणि काही स्थानिकांचा इथे उत्खनन करण्यास विरोध आहे. सोबतच नक्षलवाद्यांनी देखील प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. मागील काही वर्षांत राज्य सरकारने खासगी कंपन्यांना उत्खननाची परवानगी दिली होती. परंतु स्थानिकांचा आणि नक्षलवाद्यांच्या विरोधामुळे हा प्रकल्प रखडला. त्यानंतर 2022 मध्ये राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाला होणारा विरोध मोडून काढून हा प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पापासून सरकारने 450 कोटींचा महसूल मिळाल्याचा दावा सरकारकडून केला जातो.
सुरजागडचा लोह खनिज आणि त्या आधारावर येणारे लोह पोलाद कारखाने गडचिरोलीचे भाग्य बदलतील असे दावे केले जात आहे. गडचिरोलीत सध्या दिसत असलेली शांतता आणि ती कायम ठेवण्यासाठी पोलीस आणि शासन किती तत्पर राहणार, यावर अवलंबित असणार आहे. येणाऱ्या काही वर्षात गडचिरोली जिल्हा मागासलेपणाची मरगळ झटकून विकासाच्या मार्गावर अग्रेसर होणार नाही. तर आपल्या समृद्ध खनिज संपत्तीतून राज्याच्या, देशाच्या प्रगतीत मोठा हातभार लावण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
Gadchiroli : पोलिसांचा खबऱ्या असल्याचं सांगत गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या, गेल्या 10 दिवसातील तिसरी घटना