Gadchiroli : शासकीय गाडीचा हट्टहास अन् सायकलवरून पोहचत पब्लिसिटी स्टंट? गडचिरोलीच्या अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी चर्चेत
Gadchiroli News : सध्या गडचिरोलीतील अहेरीचे (Aheri) अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे (Vijay Bhakere) चांगलेच चर्चेत आहेत.

गडचिरोली : सध्या गडचिरोलीतील अहेरीचे (Aheri) अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे (Vijay Bhakere) चांगलेच चर्चेत आहेत. त्यांना शासकीय वाहन नसल्याने खनिज संपन्न जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय वाहन नसणे ही मोठी शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमात उमटत आहे. मात्र हा प्रकार केवळ पब्लिसिटी स्टंट तर नाही ना, असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात गडचिरोलीचे (Gadchiroli News) जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी प्रतिक्रिया देताना, अप्पर जिल्हाधिकाऱ्याच्या वाहनाचे निर्लेखन करण्यासंदर्भात प्रस्ताव आला असून नवे वाहन खरेदी करण्यापर्यंत खासगी वाहन भाडेतत्त्वावर घेण्याचे आदेश दिले आहे.
स्वतःच्या कार्यालयाचेच वाहन हवे म्हणून त्यांचा हट्ट?
तरीसुद्धा स्वतःच्याच कार्यालयाचे शासकीय वाहन आणि शासकीय चालक हा अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांचा हट्ट असल्यामुळे ते सायकलने पोहोचले असतील. कुठेही दौरा करायचा असल्यास तेथील तहसीलदार यांचे किंवा खाजगी वाहन भाडे तत्वावर घेऊन ते दौरे करू शकतात. मात्र स्वतःच्या कार्यालयाचेच वाहन हवे म्हणून त्यांचा हट्ट आहे, असे ही त्यांनी सांगितलेय.
विशेष म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यापूर्वी सुद्धा चर्चेत आले होते. गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असताना नुकसानग्रस्त भागाचा दौरा करताना सुरक्षेच्या दृष्टीने लाईफ जॅकेट न घालताच चक्क नावेतून त्यांनी प्रवास केला होता. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांना नियम लागू नाहीत का? अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच अनेक ठिकाणी दौऱ्यावर जाताना स्वतःमागे एक फोटोग्राफर किंवा कॅमेरेमन ठेवून दौरे करतात, अशाही प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
बस थांब्यावर आक्षेपार्ह लिखाण, आष्टीत तणावपूर्ण शांतता
गडचिरोलीच्या सोमनपल्ली बस थांब्यावर अज्ञात व्यक्तीने महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून ठेवल्याने आष्टी शहरात तणावपूर्ण शांतता आहे. संतप्त झालेल्या समाज बांधवांनी अहेरी- चंद्रपूर, अहेरी-गडचिरोली मार्गावर चक्काजाम करीत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली. आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तणाव शांत केला. आष्टीतील बाबासाहेब आंबेडकर चौकात समाज बांधवांकडून घोषणाबाजी देत आरोपीला अटक करण्याची मागणी केली असून पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या























