Gadchiroli News : नक्षलवाद्यांच्या विरोधात गावकऱ्यांचा एल्गार; गडचिरोलीतील दोन गावांचा मोठा निर्णय; नक्षली चळवळीला मोठा हादरा!
Gadchiroli News : गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील पोयारकोठी आणि मरकणार या दोन गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केली आहे.

Gadchiroli News : नक्षलवाद्यांच्या प्रभावक्षेत्रातील 20 गावांनी काही महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांना (Gadchiroli Naxal) गावबंदी करण्याचा ठराव केल्यानंतर भामरागड तालुक्यातील पोयारकोठी आणि मरकणार या आणखी दोन गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केली आहे. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्याकडील 2 भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द करत नक्षलवाद्यांना यापुढे कोणतेही सहकार्य करणार नाही, अशी भूमिका मांडली. 2003 पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध शासकिय योजनांचा लाभ पोलीस दलाकडून नागरिकांना मिळवून दिला जात आहे. यामुळेच गेल्या काही महिन्यात गडचिरोली जिल्ह्याच्या (Gadchiroli News) अतिदुर्गम भागातील पेनगुंडासह एकूण 20 गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदीचा ठराव एकमताने संमत केला होता.
दरम्यान पोयारकोठी येथील ग्रामस्थांसाठी पोलीस दलामार्फत घेण्यात आलेल्या बैठकीदरम्यान गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन सर्वानुमते नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा ठराव प्रभारी अधिकाऱ्यांना सादर केला. यावेळी गावातील 70 ते 75 नागरीक उपस्थित होते.
नक्षली चळवळीला मोठा हादरा!
देशभरातील नक्षलप्रभावित भागात नक्षलवाद्यांची चळवळ खिळखिळी झाली असताना आता सर्व सामान्यदेखील या नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी झाले असल्याचे चित्र आहे. अशातच छत्तीसगड, महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांची कंबर अक्षरशः तुटली असल्याचे ही बोलले जात आहे. स्थानिक नागरिकांनी नक्षलवाद्यांना मदत करणे बंद केले असून आता स्थानिक तरुणांना बंदुकीपेक्षा विकास प्रकल्प आणि त्याच्यातून निर्माण होणारे रोजगार आकर्षित करत आहे. त्यामुळेच गेल्या पाच वर्षात एकही स्थानिक तरुणाला नक्षल दलममध्ये रुजू (recruit) करू शकलो नसल्याची कबुली गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे नेतृत्व करणाऱ्या आणि सरसेनापती मानल्या जाणाऱ्या 'कोला तुमरेटी उर्फ नांगसू उर्फ गिरधर' ने दिली होती. अलिकडेच त्याने ABP माझा सोबत विशेष संवाद साधतांना ही माहिती दिली होती. त्यात आता गाव पातळीवर नक्षलवाद्यांना गावबंदी घालण्याच्या निर्णयाने नक्षल चळवळीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
शंकरपटातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
बैल जोडीच्या शंकरपटाचं आयोजन असलेल्या परिसरातील तलावालगत खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भंडाऱ्याच्या लाखनी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी जुगार खेळणाऱ्यांनी सिनेस्टाईल सैरावैरा पळ काढला. मात्र, पोलिसांनी 8 जुगारूंना ताब्यात घेतलं. या कारवाईत लाखनी पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांकडून 40 हजार रुपये रोख रकमेसह 8 मोबाईल, चार टू व्हीलर असा एकूण ३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली.
इतर महत्वाच्या बातम्या























