कुंपणानेच शेत खाल्ले! सुरक्षा रक्षकाने पळवली कॅश व्हॅनमधील पाच लाखांची रोकड, कल्याणमधील घटनेने खळबळ
Crime News : सुरक्षा रक्षकाने कॅश व्हॅन मधील पाच लाख रुपयांची चोरी केल्याचे समोर आले आहे. ही घटना कल्याण पूर्वेत घडली आहे.
Crime News : एटीएममध्ये कॅश भरणा करण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनमधील 18 लाखांमधील पाच लाख रुपये मोठ्या शिताफीने चोरल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही चोरी कॅश व्हॅनमधील सुरक्षा रक्षकानेच केली आहे. पाणी पिण्याच्या बहाण्याने व्हॅन मधून उतरलेला सुरक्षारक्षक परत न आल्यामुळे व्हॅनमधील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी कॅश चेक केली असता त्यांना पाच लाख रुपये कमी असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षक प्रेम भाटी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली, कल्याण उल्हासनगर परिसरातील एटीएममध्ये कॅश भरणा करण्याचे काम रायटर सर्विस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत केले जाते. 27 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे कर्मचारी विशाल कांबळे, सुरक्षा रक्षक प्रेम भाटी, कस्टोडीयन सुशील गुप्ता आणि व्हन चालकाने कल्याण आणि उल्हासनगर मधील एटीएममध्ये पैसे भरल्यानंतर उरलेले 18 लाख रुपये घेऊन ते डोंबिवलीच्या दिशेने जात होते. यावेळी विठ्ठलवाडी स्थानकाजवळ सुशील गुप्ता उतरून गेल्यानंतर विशाल कांबळे चालकाच्या बाजूला जाऊन बसले.
विशाल कांबळे पुढे बसल्यामुळे व्हॅनच्या मागील सीटवर कॅश आणि सुरक्षा रक्षक होते. हीच संधी साधत सुरक्षा रक्षकाने या रकमेतील 5 लाख रुपये काढून घेतले. यानंतर गाडी कल्याण पूर्वेतील विजय नगर नाक्याजवळ पोहचली. यावेळी आपल्याला तहान लागल्याने पाण्याची बाटली खरेदी करण्याचे कारण देत प्रेम गाडीतून खाली उतरून गेला. मात्र बराच वेळ झाला तरी तो परत न आल्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी गाडीतील कॅश तपासली असता 18 लाख रूपयांमधील पाच लाख रुपये गायब असल्याचे आढळून आले.
या घटनेनंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी सुरक्षा रक्षक प्रेम भाटी विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. रायटर सर्विस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने सुरक्षेचे काम दुसऱ्या एका संस्थेला दिलं होतं. या संस्थेमार्फत प्रेम भाटे याची नियुक्ती करण्यात आली होती. प्रेम भाटीचा आधार कार्डवरील पत्ता देखील चुकीचे असल्याने प्रेम भाटे याने दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी या संस्थेने केली नसल्याचे देखील समोर आले आहे. पोलीस फरार झालेला आरोपी प्रेम भाटी याचा शोध घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या