चोरट्यांनी चक्क जेसीबीने फोडले एटीएम, सांगली जिल्ह्यातील मिरजमधील घटना
Sangli News Update : चोरट्यांनी चक्क जेसीबीने एटीएम फोडले आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये ही घटना घडली आहे.
Sangli News Update : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामधील आरग गावात चोरट्यांनी चक्क जेसीबीने एटीएम फोडले आहे. परंतु, या एटीएम मधील 27 लाख रूपयांची रक्कम चोरट्यांना चोरता आली नाही. आरग गावात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.
मिरज तालुक्यातील आरग गावात ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. या एटीएमजवळ सुरक्षा रक्षक नसल्याचे पाहून चोरट्यांनी जेसीबीने एटीएम फोडण्याचे धाडस दाखवले आहे. चोरट्यांनी फोडलेल्या एटीएममध्ये 27 लाखांची रोख रक्कम होती. जेसीबीने चोरट्यांनी एटीएम फोडलं असलं तरी त्यातील 27 लाख रूपयांची रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही.
एटीएम फोडत असल्याचा आवाज येऊ लागल्यामुळे स्थानिकांना या घटनेचा संशय आला. याची कुणकुण चोरांना लागल्यामुळे चोरटे रक्कम न घेताच पसार झाले. शनिवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास एका पेट्रोल पंपावर उभा करण्यात आलेले जेसीबी चोरट्यांनी चोरी करून एटीएम फोडले. जेसीबीने एटीएम मशीन उचलून बाहेर घेतले आणि त्याचे तीन तुकडे केले.
धक्कादायक बाब म्हणजे या चोरीसाठी गावातीलच एका व्यक्तीचे जेसीबी वापरले असून ते चोरून आणले होते का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. पोलिसांना आरग गावाजवळीलच एका रस्त्यावर चोरीतील जेसीबी मिळाले असून पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे.
एटीएम फोडीची ही घटना शनिवारी मध्य रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनेनंतर मध्य रात्रीच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम , गुन्हे शाखेचे सर्जेराव गायकवाड, मिरज ग्रामीणचे सीपीआय चंद्रकांत बेंद्रे यांनी भेट दिली. दरम्यान, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. एटीएमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा आणि सुरक्षारक्षक नव्हता. यामुळेच चोरांनी जेसीबीने एटीएम फोडण्याचे धाडस केले, असे पोलिसांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
Pune : घरात थेट 20 हजारांची वीजचोरी, चोरी उघड होताच मारहाण करणारा कंत्राटी कर्मचारी बडतर्फ
मुंबई ते पुणे दरम्यान एक्सप्रेस गाड्यामध्ये तो करायचा मोबाईल चोरी, 4 वर्षांनी अडकला पोलिसांच्या जाळ्यात