Dhule Rain Update : मागील वर्षी आतापर्यंत 285 मिलिमीटर पाऊस, यंदा मात्र अवघा 177 मिलिमीटर पाऊस
Dhule Rain : धुळे जिल्ह्यात गेल्या दहा ते 15 दिवसापासून फक्त ढगाळ वातावरण असून पावसाने पाठ फिरवली आहे.
Dhule Rain Update : धुळे (Dhule) जिल्ह्यात गेल्या दहा ते 15 दिवसांपासून फक्त ढगाळ वातावरण (Rainy Season) असून पावसाने पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत 285 मिलिमीटर पाऊस झाला होता, मात्र यंदा फक्त 177 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत 108 मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. दमदार पाऊस नसल्याने शेतकरी देखील हवालदिल झाला असून आकाशाकडे डोळे लागले आहेत.
धुळे जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाची शेतकऱ्यांसह (Farmers) सर्वसामान्य नागरिकांना प्रतीक्षा असून अपूर्ण पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. तर शेतकऱ्यांवर दुसरीकडे दुबार पेरणीचे (Kharip Season) संकट घोंगावत असून गेल्या वर्षी सहा ऑगस्टपर्यंत चार मध्यम प्रकल्प 100 टक्के भरले होते. मात्र यंदा मध्यम प्रकल्पात केवळ 40 टक्के जलसाठा असून दोन प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत. पावसाने दडी मारल्याने यंदाचा खरीप हंगाम फक्त नावापुरता उरला आहे. रिमझिम पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने पेरण्या पूर्ण केल्या. धुळे तालुक्यातील बारा मंडळात एक लाख 7 हजार 796 हेक्टरवर शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली असून मात्र आता पाऊस नसल्याने पिकांचा आणि चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे.
दरम्यान निम्मा पावसाळा संपला तरी देखील अद्याप दमदार पाऊस झाला नाही, नदी नाले कोरडेठाक असून विहिर, बोरवेलची पाणीपातळी घटलेलीच आहे. रिमझिम पावसावर तग धरलेल्या खरीप पिकांवर शेतकरी थोडाफार आनंदी असला तरी पावसाची परिस्थिती अशीच राहिल्यास खरीप हंगाम धोक्यात येऊ शकतो. ढगाळ वातावरणामुळे कपाशी, मका, तूर, भाजीपाला या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुढील आठ ते दहा दिवसात दमदार पावसाने हजेरी लावली नाही तर दुष्काळाची झळ ही जिल्ह्यात तीव्र होणार असून दुष्काळाचे सावट उभे राहणार आहे. तर दुसरीकडे कोरडवाहू क्षेत्रातील परिस्थिती देखील गंभीर झाली असून पावसाच्या भरवशावर असलेली आगामी पिकांची लागवड देखील धोक्यात आली आहे.
धुळे जिल्ह्याला पावसाची प्रतीक्षा
धुळे जिल्ह्यात खरिपाची पेरणी झाली असून यात प्रामुख्याने दोन लाख तीन हजार हेक्टरवर सर्वाधिक कापूस लागवड झालेली आहे. विशेष म्हणजे गतवर्षापेक्षा जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा वाढलेला आहे. मूग, उडीद, बाजरी, ज्वारी, भुईमूग या पिकांचा पेरा घटलेला दिसून येत आहे. सोयाबीनपेक्षा तुरीला यंदाच्या खरिपात दुय्यम स्थान शेतकऱ्यांनी दिले आहे. दरम्यान पेरणी होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र दुसरीकडे दमदार पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर असून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
संबंधित बातमी :
Dhule Rain: धुळे, नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाची पाठ; धुळ्यातील तलावांनी गाठला तळ