Dhule Lok Sabha : निवडणुकीसाठी सुभाष भामरेंकडून 29 लाख तर शोभा बच्छावांकडून 25 लाख खर्च, आता प्रशासनाने दोघांनाही धाडली नोटीस
धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी आपला प्रचार खर्च सादर केला. यात तफावत आढळल्याने दोन्ही उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली.
Dhule Lok Sabha Election 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे (Subhash bhamre) आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांनी आपला प्रचार खर्च सादर केला असून डॉक्टर सुभाष भामरे यांचा 29 लाख रुपये तर डॉक्टर शोभा बच्छाव यांचा 25 लाख रुपयांचा खर्च झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या दोन्ही उमेदवारांच्या करतात तफावत असल्याने प्रशासनाने दोन्ही उमेदवारांना नोटीस (Notice) बजावली आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यानंतर उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी दुसरा खर्च तपासणी पर्यंत आपल्या प्रचाराचा खर्चाचा अहवाल सादर केला.
खर्चात तफावत आढळल्याने भामरे, बच्छावांना नोटीस
यात डॉक्टर सुभाष भामरे यांनी 29 लाख 29 हजार 832 रुपये तर काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांनी 25 लाख 58 हजार 63 रुपये खर्च केले आहे. प्रशासनाकडून अद्यापही खर्चाची तपासणी सुरू असून दोन्ही उमेदवारांच्या तपासणी उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चात तफावत आढळल्याने त्यांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे.
स्टार प्रचारकांच्या सभांच्या खर्चाचा समावेश नाही
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या. त्यात केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी (Yogi Adityanath) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या सभेचा समावेश होता. मात्र या सभांच्या खर्चाचा दोन्ही उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चात समावेश करण्यात आलेला नाही.
धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 60.21 टक्के मतदान
दरम्यान, धुळे लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 1.21 टक्क्यांची वाढ होत सरासरी 60.21 टक्के मतदान झाले. यंदा वंचित बहुजन आघाडी, एमआयएम पक्ष रिंगणात नसल्यामुळे मुस्लिम समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण टळले. परिणामी, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारामध्ये अटीतटीची लढत झाल्याचे चित्र आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण 20 लाख 22 हजार 61 मतदार आहेत. त्यापैकी 12 लाख 17 हजार 523 मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी सरासरी 60.21 टक्के आहे. धुळे लोकसभा मतदारसंघांतर्गत धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण अशी सहा विधानसभा क्षेत्रे आहेत. धुळ्यातून सुभाष भामरे की शोभा बच्छाव, कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा