Dhule Lok Sabha : सुभाष भामरेंपेक्षा शोभा बच्छाव अधिक श्रीमंत, धुळ्यातील उमेदवारांकडे किती कोटींची संपत्ती?
Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या मालमत्तेच्या विवरणानुसार भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांच्या तुलनेत काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव श्रीमंत आहेत.
Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या मालमत्तेच्या विवरणानुसार, भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamare) यांच्या तुलनेत कॉग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) श्रीमंत आहेत.
डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे 7 कोटी 43 लाख 71 हजारांची स्थावर मालमत्ता आहे, तर डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे 14 कोटी 32 लाख 10 हजार 793 रूपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञा पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.
डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे किती मालमत्ता?
डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे 6 लाख 84 हजार, तर त्यांच्या पत्नीकडे 8 लाख रुपयांची रोख रक्कम आहे. डॉ. भामरे यांच्याकडे 2 कोटी 84 लाख 52 हजार 969 रुपयांची, तर त्यांच्या पत्नीकडे 3 कोटी 77 लाख 21 हजार 579 रूपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यात विविध बँकेतील मुदत ठेवी, शेअर्सचा समावेश आहे. डॉ. सुभाष भामरे यांच्यावर कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेचे डॉ. सुभाष भामरे कर्ज नाही. वरळी येथे त्यांच्या मालकीची सदनिका आहे. त्यांच्या नावावर धुळे तालुक्यातील खेडे येथे 12 एकर, तर न्याहळोद येथे 15 एकर जमीन आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे खेडे येथे 18 एकर जमीन आहे. डॉ. भामरे यांच्या पत्नीकडे 367.77 ग्रॅम सोने आहे. त्याचे मूल्य 27 लाख 21 हजार 498 रूपये एवढे आहे. शिवाय 28 हजारांचा एक हिरा आहे. डॉ. भामरे यांची स्थावर मालमत्ता 7 कोटी 43 लाख 71 हजार रुपये किंमतीची, तर त्यांच्या पत्नीची स्थावर मालमत्ता 4 कोटी 70 लाख 46 हजार रूपये किमतीची आहे.
डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे किती मालमत्ता?
काँग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे 7 लाख 32 हजार 740 रूपये, तर त्यांच्या पतीकडे 11 लाख 28 हजार 320 रूपये रोख आहेत. डॉ. बच्छाव यांच्याकडे 1 कोटी 19 लाख 2 हजार 884 रूपयांची, तर त्यांच्या पतीकडे 2 कोटी 77 लाख 36 हजार 272 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांनी गौरव बच्छाव यांच्या प्रतिष्ठानात 5 लाखांची, तर संगीता भालेराव यांच्या प्रतिष्ठानात 10 लाख 5 हजारांची गुंतवणूक केली आहे. विविध बँकांमध्ये त्यांच्या मुदती ठेवी आणि बचत आहे. डॉ. शोभा बच्छाव त्यांच्याकडे 26 लाख 91 हजार 638 रुपये किमतीची कार आहे. डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे 350 ग्रॅम सोने असून, त्याची किंमत 21 लाख रूपये आहे. त्यांच्या पतीकडे 9 लाखांचे 150 ग्रॅम सोने आहे. डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे पिंपळगाव वखार, मखमलाबाद येथे शेतजमीन आणि नाशिक येथे भूखंड आहे. शिवाय मुंबईतील अंधेरी भागातील लोखंडवाला परिसरात सदनिका आहे. डॉ. बच्छाव यांच्याकडे एकूण 14 कोटी 32 लाख 10 हजार 793 रुपयांची, तर त्यांच्या पतीकडे 12 कोटी 38 लाख 57 हजार 109 रूपयांची स्थावर मालमत्ता आहे.
आणखी वाचा