Dhule Dengue : धुळे जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे थैमान, शिरपूर तालुक्यातील 13 वर्षीय बालकाचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू
Dhule News : शिरपूर (Shirpur) शहरातील तेरा वर्षीय बालकाचा डेंग्यू सदृश्य (Dengue) आजाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
धुळे : एकीकडे राज्यभरात साथींच्या आजाराने (Epidemic Diseases) थैमान घातले असून सद्यस्थितीत सर्दी, डोकेदुखी, ताप आदी आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. अशातच धुळे जिल्ह्यातील शिरपूर (Shirpur) शहरातील क्रांती नगरात राहणाऱ्या एका 13 वर्षीय बालकाचा डेंग्यू सदृश्य (Dengue) आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. स्वामी सचिन माळी असे या मृत बालकाचे नाव असून जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत तीन जणांचा डेंग्यूने मृत्यू झाले आहेत.
पाऊस थांबलं असला तरी साथींच्या आजारांनी (Epidemic diseases) डोकेवर काढले असून राज्यभरात दवाखाने फुल्ल होत आहेत. सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी आदी आजारांचे रुग्ण आजूबाजूला आढळून येत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर डेंग्यू सदृश्य आजारांची लक्षणे देखील आढळून येत आहेत. या कारणामुळे एका 13 वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर शहरातील क्रांतीनगर मध्ये एका 13 वर्षीय बालकाचा डेंगू सदृश्य आजाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली आहे. 13 वर्षीय हिमांशू उर्फ स्वामी सचिन माळी असे मयत बालकाचे नाव आहे.
दरम्यान 12 ऑक्टोबर रोजी स्वामींची तब्येत बिघडल्याने त्यास शिरपूर शहरातील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. शिरपूर शहरासह तालुक्यात डेंग्यू सदृश आजाराने थैमान घातले असून आतापर्यंत शहरासह तालुक्यात डेंग्यू सदृश आजाराने ग्रासलेले बहुतांश नागरिक विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. डेंग्यूचा प्रसार लक्षात घेता महानगरपालिका प्रशासन डेंग्यू रोखण्यासाठी निष्क्रिय ठरत असल्याने नागरिकांतर्फे संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ऑक्टोबर महिन्यात म्हणजे आतापर्यंत धुळे शहरात एकूण 35 संशयित ताप रुग्ण आढळल्या असून त्यामध्ये 26 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह तर एका वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह व आठ रुग्णांचा अहवाल येणे बाकी आहे असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
धुळे महापालिकेकडून आवाहन
धुळे महापालिका व जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत शहरात कीटकजन्य आजारावर नियंत्रणासाठी कंबर कसण्यात आली आहे. महानगरपालिकेकडे वर्षभर पुरेल इतका औषध साठा उपलब्ध असून नागरिकांनी एक दिवस कोरडा दिवस पाळावा. आपल्या घरातील भांडी घासून पुसून पाणी भरावे. कूलर, फ्रिज तसेच फुलदाणी नियमितपणे स्वच्छ करावी. एडीज या डासाची उत्पत्ती आपल्या घरामध्ये तसेच परिसरामध्ये होते. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवावा व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
इतर महत्वाची बातमी :
Dengue : तुम्हाला डेंग्यू झाला आहे का? तर या गोष्टींची घ्या काळजी, हे आहेत सोप्पे मार्ग!