Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Pune News: अजित पवार यांनी पुण्यात कर्जमाफीबाबत भाष्य केले. कर्जमाफीबाबत मी कोणतेही वक्तव्य केले नाही, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न. अजितदादांचं स्पष्टीकरण
पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उल्लेख मी कधी केलाच नव्हता, अशा आशयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य अलीकडे चांगलेच गाजले होते. त्यामुळे महायुती सरकारने निवडणूक संपल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी (Farmer Loan Waiver) देण्याचे आश्वासन पाळले नाही, अशी टीका विरोधकांकडून सुरु झाली होती. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही, असे संकेत मिळाल्याने त्यांच्यावरही टीकेची झोड उठली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले.
अजित पवारांचा कर्जमाफीला विरोध, ही बातमी प्रसारमाध्यमांनी चालवली होती. आपण बातम्या देताना काय बातम्या देतोय, याचा विचार केला पाहिजे. मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही, असं कधी म्हणणार नाही. आम्हीदेखील शेतकरी आहोत. जिथे शेतकऱ्याला मदत होईल, अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मात्र, धादांत खोट्या बातम्या देऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने कर्जमाफीची बातमी देण्यात आली. पण मला बोलायचं असेल तर मी स्वत: बोलेन. तरीही प्रसारमाध्यमांकडून सूत्रांच्या हवाल्याने का बातम्या दिल्या जातात? या 'सूत्रा'ला जीवनगौरव पुरस्कार दिला पाहिजे, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली.
यावेळी अजित पवार यांनी पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमच्या वाढत्या फैलावाबाबतही भाष्य केले. राज्य सरकार आणि आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. या आजाराच्या उपचारासाठी जास्त खर्च येत आहे. आर्थिक बाबी सांभाळायचं काम सरकारकडे आहे. मी सोमवारी यासंदर्भात मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करेन, असे अजित पवार यांनी म्हटले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात 60 कोटींच्या आराखड्याला मान्यता देण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सामजिक न्याय आयुक्तालय ,दिव्यांग कार्यालयाच्या कामासाठी 225 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पुण्यात लवकरच टाऊन प्लॅनिंग कार्यालय उभारले जाणार आहे. साखर संकुलला सहकार भवन करणार. राज्यातील अनेक कार्यालये पुण्यात होत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले.
महायुतीत मतभेद नाहीत, आर्थिक परिस्थितीबाबत चर्चा होऊन कर्जमाफीचा निर्णय होईल: अशोक चव्हाण
कर्जमाफीच्या निर्णयावरुन महायुतीत मतभेद असल्याची चर्चा आहे . पण महायुतीत कुठलेच मतभेद नाहीत. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील . अर्थमंत्री म्हणुन अजित पवार यांच्या काही कल्पना असतील, त्याबाबत मला नाही. राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत चर्चा होऊन कर्जमाफीचा निर्णय होईल. यात मतभेदाचा विषय नाही, असे भाजप नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले.
आणखी वाचा