Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Indian Immigrants Around The World : दरवर्षी सुमारे दीड लाख भारतीय नागरिकत्वाचा त्याग करत आहेत. भारतीय नागरिकत्व सोडून या लोकांनी 135 देशांचे नागरिकत्व घेतले आहे.
Indian Immigrants Around The World : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशात येणाऱ्या अवैध स्थलांतरितांना दणका दिल्यानंतर सर्वाधिक झटका भारतीयांना बसला आहे. देश सोडून अमेरिकेत स्थायिक होण्याचे प्रमाण जगामध्ये भारतीयांचे (Indian Immigrants Around The World) सर्वाधिक प्रमाण आहे. अमेरिकेत सर्वाधिक चर्चेत H1-B व्हिसा सुद्धा सर्वाधिक भारतीयांना मिळतो. त्यामुळे ट्रम्प यांच्या बदलत्या प्रशासकीय धोरणांमध्ये सर्वाधिक होरपळ भारतीयांची होणार आहे. अमेरिकेसह कॅनडासारख्या देशांमध्येही भारतीय मोठ्या प्रमाणात स्थायिक होत आहेत. या देशांत गेलेले भारतीय त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडून देत असल्याचे कारण आहे. 2023 मध्ये भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्यांची संख्या 2 लाखांच्या पुढे गेली होती. गेल्या काही वर्षांत भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ट्रम्प बेकायदेशीरपणे अमेरिकेत येणाऱ्या लोकांवर अंकुश ठेवण्याच्या तयारीत आहेत. इमिग्रेशन धोरण कठोर करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय आपला देश का सोडत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात वाढ होण्याचे कारण काय?
भारतीय नागरिकत्व का सोडत आहेत?
भारतीय नागरिकत्व सोडण्यामागे अनेक मोठी कारणे आहेत. यामध्ये परदेशातील चांगला पगार आणि चांगले वातावरण, भारताच्या तुलनेत परदेशातील उच्च शिक्षणाचा स्तर, देशातील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण, धार्मिक उन्माद, व्यवसायाच्या संधींचा अभाव यांचा समावेश होतो. याशिवाय, भारतातील एकल नागरिकत्वाची तरतूद आणि दुहेरी नागरिकत्व नसणे हेही महत्त्वाचे कारण आहे.
भारतीय नागरिकत्व सोडून अधिक कुठे स्थायिक होत आहेत?
भारतीय नागरिकत्व (Indian Immigrants Around The World) सोडून अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूके, जर्मनी, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, पेरू, नायजेरिया, झांबिया या देशांमध्ये स्थायिक होत आहेत. काही भारतीय नागरिकत्व सोडून पाकिस्तान आणि चीनमध्ये सुद्धा स्थायिक होत आहेत.
दरवर्षी सुमारे दीड लाख भारतीय नागरिकत्व सोडत आहेत
दरवर्षी सुमारे दीड लाख भारतीय नागरिकत्वाचा त्याग करत आहेत. भारतीय नागरिकत्व सोडून या लोकांनी 135 देशांचे नागरिकत्व घेतले आहे. यामध्ये अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया सारखे मोठे देश आणि थायलंड, मलेशिया, पेरू, नायजेरिया आणि झांबिया सारखे छोटे देश देखील समाविष्ट आहेत. यातील बहुतांश लोकांनी नोकरीमुळे भारतीय नागरिकत्व सोडले आहे.
भारतीय कोणत्या देशात जास्त स्थायिक आहेत?
एका मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणारे सरासरी 44 टक्के भारतीय नागरिकत्व सोडतात. त्याच वेळी, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या 33 टक्के भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की अमेरिकेत गेलेले 44 टक्के भारतीय नंतर नागरिकत्व घेतात आणि तिथेच स्थायिक होतात. त्याच वेळी, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला जाणारे 33 टक्के भारतीय देखील असेच करतात. त्याचप्रमाणे ब्रिटन, सौदी अरेबिया, कुवेत, यूएई, कतार, सिंगापूर या देशांमध्येही मोठ्या प्रमाणात भारतीय लोक स्थायिक होत आहेत.
भारतीयांनी चीन आणि पाकिस्तानचेही नागरिकत्व सोडले
गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2021 मध्ये 1,63,370 लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले. संसदेत सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजात या लोकांनी वैयक्तिक कारणांसाठी नागरिकत्व सोडल्याचे म्हटले आहे. अमेरिकन नागरिकत्वासाठी सर्वाधिक 78,284 लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. यानंतर 23,533 लोकांनी ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेतले आणि 21,597 लोकांनी कॅनडाचे नागरिकत्व घेतले. चीनमध्ये राहणाऱ्या 300 लोकांनी तेथील नागरिकत्व घेतले आणि 41 जणांनी पाकिस्तानचे नागरिकत्व घेतले. सन 2020 मध्ये नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या 85,256 होती आणि 2019 मध्ये 144,017 लोकांनी नागरिकत्व सोडले. 2019 पासून तब्बल साडे आठ लाख भारतीयांनी देशाला रामराम केला आहे.
कोरोना महामारीच्या काळात कमी लोकांनी नागरिकत्व सोडले
2015 ते 2020 या कालावधीत 8 लाखांहून अधिक लोकांनी आपले नागरिकत्व सोडले. त्याच वेळी, 2020 मध्ये या आकडेवारीत घट झाली होती, परंतु त्यामागील कारण कोरोना असल्याचे मानले जात आहे. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परदेशात 1.25 कोटी भारतीय नागरिक राहतात, त्यापैकी 37 लाख लोक OCI म्हणजेच भारताचे परदेशी नागरिकत्व कार्डधारक आहेत.
OIC कार्ड म्हणजे काय, तो कोणत्या प्रकारचा पर्याय आहे?
भारतात दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नाही. म्हणजेच तुम्हाला इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व हवे असेल तर तुम्हाला भारतीय नागरिकत्व सोडावे लागेल. परदेशात स्थायिक झालेल्या आणि तिथले नागरिकत्व घेतलेल्या भारतीयांसाठी OCI कार्ड ही एक खास सुविधा आहे. OCI म्हणजे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया. एक प्रकारे, OCI भारतात राहण्याची, काम करण्याची आणि आयुष्यभर सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा देते, तसेच OCI धारक त्याला हवे तेव्हा व्हिसाशिवाय भारतात येऊ शकतो. ते आजीवन वैध आहे.
नागरिकत्व सोडण्याचे सर्वात मोठे कारण काय?
भारतात एकल नागरिकत्वाची तरतूद आहे. भारतीय राज्यघटना भारतीयांना दुहेरी नागरिकत्व धारण करण्याची परवानगी देत नाही. इटली, आयर्लंड, पॅराग्वे, अर्जेंटिना यांसारख्या देशांमध्ये दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आहे. या देशांचे नागरिकत्व सहज मिळू शकते. भारतीय नागरिकत्व कायदा, 1955 नुसार नागरिकत्व मिळू शकते, परंतु भारताचे नागरिक असताना तुम्ही दुसऱ्या देशाचे नागरिक होऊ शकत नाही.
परदेशात उत्तम राहणीमान आणि शिक्षणाच्या संधी
भारत 2030 पर्यंत जपान आणि जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, परंतु दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. इतर देशांच्या तुलनेत लोकांना शिक्षण, कमाई आणि औषधोपचाराच्या खूप कमी संधी आहेत. याशिवाय प्रदूषणासारख्या समस्यांमुळे लोकांना परदेशात स्थायिक व्हायचे आहे.
परदेशात अधिक कमाई करणे हे देखील एक मोठे कारण
अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांचा सखोल अभ्यास करणाऱ्या आर्थर डब्ल्यू. हेलवेग यांच्या मते, भारत सोडण्यामागे पैसा हे सर्वात मोठे कारण आहे. हेलवेगच्या म्हणण्यानुसार, विद्यापीठातील शिक्षण, नोकरी, मुलांचे करिअर आणि निवृत्ती यासारख्या समस्यांचा विचार करूनच लोक भारत सोडतात.
कामाच्या तासाला जास्त पैसे
भारतात प्रति तास सरासरी मजुरीचा खर्च 170 रुपये, ब्रिटनमध्ये 945 रुपये आणि अमेरिकेत 596 रुपये आहे. यासोबतच या देशांमध्ये कामगार कायद्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. त्यामुळे लोक या देशांमध्ये काम करण्यास प्राधान्य देत आहेत.
तरुण उच्च शिक्षणासाठी जातात
भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. अहवालानुसार, परदेशात जाणारे 60 टक्क्यांहून अधिक भारतीय विद्यार्थी त्यांच्या देशात परतत नाहीत. तिथे नोकरी मिळाल्यानंतर ते तिथले नागरिकत्व घेतात.
इतर महत्वाच्या बातम्या