Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Tahawwur Rana : कनिष्ठ न्यायालये आणि अनेक संघीय न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाई हरल्यानंतर राणाने शेवटचा सॅन फ्रान्सिस्कोमधील यूएस कोर्ट ऑफ अपील फॉर द नॉर्थ सर्किटमध्ये धाव घेतली होती.
Tahawwur Rana : 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाला (Tahawwur Rana's extradition to India) शनिवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात राणाचा ताबा हवा असल्याने पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक राणाचे प्रत्यार्पण करण्याची भारताची बऱ्याच काळापासून मागणी होती. कनिष्ठ न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाई हरल्यानंतर राणाने भारतात प्रत्यार्पणाविरुद्ध अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर काही आठवड्यांनंतर प्रत्यार्पणास मंजुरी मिळाली आहे. कनिष्ठ न्यायालये आणि अनेक संघीय न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाई हरल्यानंतर राणाने शेवटचा सॅन फ्रान्सिस्कोमधील यूएस कोर्ट ऑफ अपील फॉर द नॉर्थ सर्किटमध्ये धाव घेतली होती.
भारताला प्रत्यार्पण न करण्याची राणाची ही शेवटची कायदेशीर संधी होती. 16 डिसेंबर रोजी, यूएस सॉलिसिटर जनरल एलिझाबेथ बी प्रीलॉगर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका फेटाळण्याची विनंती केली. राणाचे वकील जोशुआ एल ड्रेटेल यांनी 23 डिसेंबर रोजी त्याच्या उत्तरात अमेरिकन सरकारच्या शिफारशीला आव्हान दिले आणि सर्वोच्च न्यायालयात त्याची रिट स्वीकारण्याची विनंती केली होती.
राणा-हेडलीने मुंबई हल्ल्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली होती
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार राणा दहशतवाद्यांना हल्ल्याचे ठिकाण आणि भारतात आल्यानंतर राहण्याची ठिकाणे सांगून मदत करत होता. राणानेच ब्लू प्रिंट तयार केली होती, ज्याच्या आधारे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. राणा आणि हेडलीवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप होता. मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाचा मोठा हात होता, असे आरोपपत्रात म्हटले आहे.
राणाचे अपील 15 ऑगस्ट 2024 रोजी फेटाळले
प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध राणाने केलेले अपील अमेरिकन कोर्टाने 15 ऑगस्ट रोजी फेटाळले होते. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवले जाऊ शकते, असे अमेरिकन न्यायालयाने 15 ऑगस्ट रोजी दिलेल्या निर्णयात म्हटले होते. भारताच्या ताब्यात जाऊ नये म्हणून पाकिस्तानी वंशाच्या तहव्वूर राणाने अमेरिकेच्या न्यायालयात हेबियस कॉर्पस दाखल केला होता. जेव्हा एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर कोठडीत ठेवले जाते तेव्हा हेबियस कॉर्पस याचिका वापरली जाते. तथापि, लॉस एंजेलिसच्या जिल्हा न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, भारताने तहव्वूरच्या प्रत्यार्पणाची मागणी ज्या आरोपांच्या आधारे केली आहे, त्या आरोपांचा विचार करून त्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली जाऊ शकते.
तहव्वूर हा हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र
गेल्या वर्षी न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की तहव्वूर हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र होता आणि हेडली लष्कर-ए-तैयबासोबत काम करत असल्याचे त्याला माहीत होते. हेडलीला मदत करून आणि त्याला आर्थिक मदत देऊन तहव्वूर दहशतवादी संघटना आणि त्याच्यासह दहशतवाद्यांना पाठिंबा देत होता. हेडली कोणाला भेटत होता, काय बोलतोय याची माहिती राणाकडे होती. त्याला हल्ल्याचे नियोजन आणि काही लक्ष्यांची नावेही माहीत होती. राणा हा या संपूर्ण कटाचा एक भाग होता आणि त्याने दहशतवादी हल्ल्यासाठी निधी पुरवल्याचा गुन्हा केल्याचा पूर्ण संशय आहे, असे अमेरिकन सरकारने म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या