सहानुभूतीचं कार्ड आता चालणार नाही, ते घासून गुळगुळीत झालं, अर्चना पाटलांचं ओमराजेंच्या आरोपांना प्रत्युत्तर
सहानुभूतीचा कार्ड आता जुनं झालंय. हे कार्ड आता चालणार नाही,असं म्हणत धाराशीव लोकसभेच्या (Dharashiv loksabha) उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांनी ओमराजेंवर (Omraje Nimbalkar) टीका केली.
Archana Patil on Omraje Nimbalkar: सहानुभूतीचा कार्ड आता जुनं झालंय. हे कार्ड आता चालणार नाही. कारण घासून ते गुळगुळीत झालं आहे, असं म्हणत धाराशीव लोकसभेच्या (Dharashiv loksabha) महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांनी ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर टीका केली. धाराशिव मतदारसंघातील 20 लाख मतदारांना पाटील आणि निंबाळकर कुटुंबातील भाऊबंदकीशी काहीही देणं घेणं नाही. मतदारांना पुढील पाच वर्षात इथे काय विकास होणार आहे हे महत्त्वाचं वाटत असल्याचे पाटील म्हणाल्या.
एबीपी माझाशी बोलताना धाराशिव चे खासदार व माहविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आपले वडील पवनराजे निंबाळकर यांचे हत्या प्रकरणी पाटील कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. हिंमत असेल तर दोन महिन्यात फास्टट्रॅक कोर्टामध्ये हत्या प्रकरणाचा निकाल लावावा असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिले होते. त्यानंतर अर्चना पाटील यांनी ओमराजे सहानुभूती कार्ड खेळत असल्याचा आरोप केला. आता तुमचा सहानुभूतीचा कार्ड चालणार नाही असा हल्लाबोल केला आहे.
ओमराजेंच्या आरोपांना अर्चना पाटील यांचं प्रत्युत्तर
पवनराजे यांच्या हत्येचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्याबद्दल जास्त बोलणे योग्य नाही. मात्र, पवनराजे हत्या प्रकरणाच्या न्यायालयीन कारवाईत कोणी अडथळे निर्माण केले. प्रकरण महाराष्ट्र बाहेर नेण्यासाठी कोणी प्रयत्न केले आणि त्या दुर्दैवी घटनेचा वापर राजकीय फायद्यासाठी वारंवार कोणी केला असे प्रश्न उपस्थित केले. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही देखील ओमराजेंवर जोरदार टीका केली.
पद्मसिंह पाटील यांच्या वतीने 25 वर्ष पवनराजे हेच कारभार सांभाळत होते
पाटील घराण्याच्या 40 वर्षाच्या सत्ता काळात धाराशिवचा विकास झाला नाही असा आरोपही ओमराजे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला होता. त्या आरोपाला पाटील दांपत्याने (अर्चना पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील) जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. चाळीस वर्षातील पाटील घराण्याच्या सत्ता काळात 25 वर्ष खासदार ओमराजे यांचे वडील पवनराजे हेच पद्मसिंह पाटील यांच्या वतीने कारभार सांभाळत होते. तेव्हा त्यांनी काय घोटाळे केले हे सर्वांना माहीत असल्याचा पलटवार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केला. जर पाटील कुटुंबाच्या सत्तेच्या काळात धाराशिवमध्ये विकास झाला नसता, तर आज भौगोलिक दृष्ट्या सर्वाधिक साखर कारखाने आणि गुळ पावडरचे उद्योग धाराशिवमध्ये राहिले नसते, असे राणा जगजितसिंह पाटील म्हणाले.
माझ्याकडील सोनं आमच्या कुटुंबाची पिढीजात संपत्ती
माझ्याकडील सोनं आमच्या कुटुंबाची पिढीजात संपत्ती असून तो राजकारणातून कमावलेला सोना नाही. मी पाटलांची सून असून माझ्याकडील सोनं सासर्यानी दिलेलं सोनं असल्याचे अर्चना पाटील म्हणाल्या. ओमराजेंनी पाटील घराण्याच्या संपत्ती आणि सोनं संदर्भात केलेल्या आरोपांचा जोरदार समाचार घेतला. दरम्यान, सवंग लोकप्रियतेसाठी ओमराजे निंबाळकर रोज शेकडो फोन कॉल घेण्याचा दावा करतात. मग ओमराजे 24 तासाच्या दिवसात 25 तास फक्त फोन कॉलच घेतात का? असं प्रश्न उपस्थित करून पाटील दांपत्यांनी ओमराजे यांच्या फोनद्वारे लोकांच्या संपर्कात राहत असल्याच्या दाव्याची खिल्ली उडवली.
महत्वाच्या बातम्या:
Omraje Nimbalkar : विरोधी उमेदवाराने पैसे वाटले तर घ्या, जास्त लागतील सांगून दुप्पट घ्या; ओमराजे निंबाळकरांचे वादग्रस्त वक्तव्य