(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Covid News : जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ डाऊन; मनपाकडून चाचण्यांवर भर
मनपा केंद्रांमध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तथा आरोग्य सेवकांना बुस्टर डोज देणे सुरु आहे. तसेच 18 ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांना खाजगी रुग्णालयात बुस्टर डोज शासकीय दराप्रमाणे देणे सुरु आहे.
नागपूरः या महिन्याच्या सुरुवातीला वाढणारा कोरोना बाधितांचा ग्राफ मागिल काही दिवसांपासून डाऊन जाण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी नागपूर जिल्ह्यात फक्त 18 बाधितांची नोंद झाली. यापैकी 14 रुग्ण शहरी असून ग्रामीणमधून 4 रुग्ण आढळून आले आहे. तर आज 46 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे, हे विशेष.
या कमी होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे शहरवासियांना काही प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. आज शहरी भागात 730 तर ग्रामीणमध्ये 353 चाचण्या करण्यात आल्या. तर आज जिल्ह्यात एकूण 405 रॅपीड अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या.
7 बाधितांवर रुग्णालयात उपचार
शहरात 184 सक्रीय बाधित असून ग्रामीण भागात 112 बाधित आहेत. सध्या 296 सक्रीय रुग्णांपैकी 289 बाधित गृह विलगिकरणात आहेत. तर जीएमसी मध्ये 1, किंग्सवे हॉस्पिटलमध्ये 1, वोक्हार्ट हॉस्पिटमध्ये 1, सेव्हनस्टार मध्ये 1 आणि मेडिट्रीना रुग्णालयात एक रुग्ण उपचार घेत आहे.
कोरोना चाचण्यांवर भर
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना चाचण्या वाढविण्यावर मनपाने लक्ष केंद्रीत केले आहे. याअंतर्गत मनपाच्या नियमित कोरोना चाचणी केंद्रांसह दहाही झोनमध्ये 'आपली बस' च्या ताफ्यातील दहा बसद्वारे चाचणी सुरु आहे. प्रत्येक झोनमध्ये एक बस देण्यात आली असून बाजारपेठ, मॉल आणि गर्दीच्या ठिकाणी मनपाच्या आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांकडून चाचण्या करण्यात येत आहेत.
गुरूवारी मनपा केन्द्रांमध्ये केवळ कोव्हॅक्सीन उपलब्ध
नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आता दिवसनिहाय वेगवेगळी लस देण्यात येत आहे. त्यामुळे गुरूवारी 23 जून रोजी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हॅक्सीन लस उपलब्ध राहणार आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे.
लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणी केलेला मोबाईल आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे. मनपा केन्द्रात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तथा आरोग्य सेवकांना बुस्टर डोज दिल्या जाईल. तसेच 18 ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांना खाजगी रुग्णालयात बुस्टर डोज शासकीय दराप्रमाणे दिल्या जाईल.