(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आमदार संजय शिरसाट विरुद्ध पालकमंत्री अब्दुल सत्तारांमध्ये सुप्त संघर्ष? छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार चर्चा
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शिरसाट यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात शिरसाट नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेत सर्वकाही अलबेल आहे का नाही? असा सवाल आता वारंवार निर्माण होतोय. शहरात असूनही आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला का उपस्थित राहिले नाहीत असा सवाल एकीकडे विचारला जात असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सिल्लोडमधील लाडकी बहिणीच्या कार्यक्रमात त्यांनीच विरोधाचे काळे झेंडे फडकवल्याचे दिसले. हे झेंडे अब्दुल सत्तारांसाठी (Abdul Sattar) होते असं म्हटल्यानंतर आता सत्तार विरुद्ध शिरसाट असा सुप्त संघर्ष दिसून येत आहे.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांची वर्णी लागल्यानंतर आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा होती. दुसरीकडे पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी शिरसाट यांच्या टिकेवर न बोलण्याचा पसंत केलं.
काय म्हणाले संजय शिरसाट?
काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी जे काळे झेंडे फडकवण्यात आले त्यात मुख्यमंत्र्यांचा कुठेही विरोध नव्हता. तर अब्दुल सत्तार यांच्या विरोधातल्या त्यांच्या काही घोषणा होत्या. त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्यात आले हे तसं चुकीचं होतं. पण त्यांच्या मागण्या अवास्तव होत्या असं म्हणता येणार नाही, असं आमदार संजय शिरसाठ म्हणाले.
अब्दुल सत्तार काय म्हणाले?
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी संजय शिरसाट यांच्या गैरहजेरीवर तसेच त्यांच्या टिकेवर न बोलणं पसंत केल्याचं दिसतंय. संजय शिरसाठ काय बोलले यावर टीका टिप्पणी करायची नाही. विरोधी पक्षातील लोक जिवंत रहावेत अशी दुवा करणारा मी आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये काल मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिरसाट यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली असून पालकमंत्री पदासाठी शिरसाट इच्छुक होते. पण अब्दुल सत्तारांकडे पालकमंत्रीपद गेल्याने ते नाराज असल्याचं म्हटलं जातंय. छत्रपती संभाजीनगरचे सत्तार यांच्या आधी संदिपान भुमरे पालकमंत्री होते. लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी आमदारकीसह मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे जिल्ह्याचं पालकमंत्री पद रिक्त होतं. यासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गैरहजेरी
लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ करण्याच्या कार्यक्रमाला काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. या कार्यक्रमात आमदार संजय शिरसाट गैरहजर होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही ते उपस्थित नसल्याने जिल्ह्यात नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा: