शेतातले पाणी चोरीला जाऊ नये म्हणून 360 डिग्री कॅमेरा, सिल्लोडमधील शेतकऱ्याची भन्नाट आयडिया
Maharashtra Drought : शेतातल्या पाण्याची चोरी होऊ नये आणि मिरची पिकामध्ये जनावर घुसू नये म्हणून सिल्लोडच्या शेतकऱ्याने शेतात 360 डिग्री कॅमेरा बसवला आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा दुष्काळाच्या मोठ्या झळा जाणवू लागल्या असून गुरा-ढोरांपासून ते जीवापाड जपलेल्या पिकांपर्यंत, सगळ्यांचीच काळजी घेताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागतेय. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना तो वाया जाऊ नये यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. अशात जर एखाद्याकडे शेतीसाठी मुबलक पाणी असेल तर? मग ते पाणी हे एखाद्या संपत्तीप्रमाणे असून इतरांचाही त्याच्यावर डोळा असू शकतो, प्रसंगी ते पाणी चोरीही केले जाऊ शकते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये बोदवड या गावात शेतकऱ्यानी त्याचे पाणी चोरी जाऊ नये म्हणून भन्नाट आयडिया लावली आहे. मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे आपल्या शेततळ्यातील पाणी चोरीला जाऊ नये आणि आलेली मिरचे जंगली प्राणी नुकसान करू नये म्हणून या शेतकऱ्याने आपल्या शेतकऱ्यावर आणि शेतावर 360 डिग्रीचा कॅमेरा लावला आहे. मराठवाड्यात एकीकडे भीषण पाणीटंचाई आहे तर दुसरीकडे या शेतकऱ्याने पाण्याची योग्य पद्धतीने काटकसर करून आणि नियोजन करून अडीच एकर क्षेत्रावर मिरचीचे पीक यशस्वी करून मिरची विकायला सुरुवात केली आहे.
पाणी आणि मिरचीची राखण करण्यासाठी शेतात 360 डिग्री कॅमेरा
सध्याच्या घडीला मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याची सुरक्षा करण्यासाठी शेतात कॅमेरा बसवण्यात आल्याची माहिती या शेतकऱ्याने दिली. रामेश्वर गव्हाणे असं या शेतकऱ्याचं नाव असून तो सिल्लोड तालुक्यातील बोधवड या गावचा आहे. 'एबीपी माझा'शी बोलताना तो शेतकरी म्हणाला की, "या वर्षी पाऊस अत्यंत कमी प्रमाणात झाला. त्यामुळे पाण्याचे नियोजन चोख पद्धतीने करावं लागलंय. हा कॅमेरा सिक्युरिटी म्हणून काम करतो. घरी बसून या शेताकडे लक्ष देता येतं. शेतात जर कुणी आलंच तर हा कॅमेरा त्याचं स्क्रीनशॉट काढून पाठवतो. तसेच मिरचीचे शेत असल्याने जर जंगली प्राणी शेतात घुसलेच तर त्याची माहितीही लगेच मिळते."
एकीकडे मराठवाड्यात मोठा दुष्काळ असला तरी दुसरीकडे पाण्याच्या काटकसरीतून शेतकऱ्यांने मिरचीची लागवड केली आहे. एवढ्या उन्हातरी पिकाला पाणी मिळत असल्याने पिकही जोमात आल्याचं दिसतंय.
महाराष्ट्रात यंदा मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा दिसतात. अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई असून त्या ठिकाणी पाण्याचा टँकर पुरवला जात आहे.
ही बातमी वाचा: