(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पालकांनी गावी सोबत घेऊन न गेल्याने मुलाची आत्महत्या; औरंगाबादच्या आदर्शनगरमधील घटना
Aurangabad : घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली होती.
औरंगाबाद: शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, पालकांनी आपल्या मुलाला गावी जाताना सोबत नेलं नाही म्हणून मुलाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. तिसगावच्या आदर्शनगरमधील म्हाडा कॉलनीमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना उघडकीस आली आहे. सौरभ विठ्ठल मिसाळ (वय 17 वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, आदर्शनगर, तिसगाव) असे या मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सौरभ विठ्ठल मिसाळ याने केंद्रीय विद्यालयातून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले असून, वसंतराव नाईक विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होता. सोबत सौरभ हा नीटची तयारी करत असल्याने एका खासगी क्लासेसमध्ये शिक्षण घेत होता. दरम्यान सौरभची इच्छा असूनही पालकांनी त्याला गावी सोबत घेऊन न गेल्याने त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून, पुढील तपास करण्यात येत आहे.
मावशीने खिडकीतून पाहिले अन् त्यांना धक्काच बसला
दोन दिवसांपूर्वीच सौरभचे वडील सुट्टीवर आले होते. तर काही महत्वाच्या कामानिमित्त पत्नी आणि 12 वर्षीय मुलीला सोबत घेऊन ते 11 ऑगस्टला नांदेडला गेले होते. या वेळी सौरभने सुद्धा सोबत येण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, पालकांनी सौरभला घरीच बसण्यास सांगितले होते. सौरभची मावशी घराशेजारीच राहते. त्यामुळे सौरभच्या जेवणाची जबाबदारी मावशीकडे होती. दरम्यान, घरात एकटा असलेला सौरभ बऱ्याच वेळापासून घराबाहेर आला नाही म्हणून त्यांनी त्याला आवाज दिला. पण, कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने सौरभच्या मावशीने खिडकीतून पाहिले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
परिसरात हळहळ व्यक्त
सैन्यात नोकरीला असलेले विठ्ठल मिसाळ सुट्टीवर घरी आले होते. दरम्यान, सौरभ यांच्या शिक्षणाकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी ते आपल्या पत्नी आणि मुलीसह नांदेडला गेले होते. यावेळी त्यांनी सौरभला घरीच थांबण्याचे सांगितले. मात्र, एवढ्या छोट्या क्षुल्लक कारणावरून सौरभ टोकाचे पाऊल उचलेल याबाबत त्यांना कोणताही अंदाज नव्हता. या घटनेने मिसाळ कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तर, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद करुन घेतली असून, पुढील तपास केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
दारुड्याचा कारनामा! भर चौकात बसची चावी काढून निघून गेला, वाहनांच्या लांबच लांब रांगा