Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Punjab Kings : माझा मुलगा कितीही मोठा झाला किंवा त्याने कितीही पैसे कमवले तरी मी माझे काम सोडणार नाही. मला आयुष्यभर माझा साधेपणा जपायचा आहे. मला सामान्य माणसासारखे जगायचे असल्याचे वडिल म्हणाले.

Punjab Kings IPL 2025 : मध्य प्रदेशमधील रीवा येथून आलेला आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला आयपीएल 2025 च्या लिलावात पंजाब संघाने 80 लाख रुपयांना खरेदी करून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. लिलावात कुलदीपची मूळ किंमत 75 लाख रुपये होती. कुलदीपचे वडील रामपाल सेन हे रेवामध्ये एक छोटेसे सलून चालवतात. ते म्हणतात, की माझा मुलगा कितीही मोठा झाला किंवा त्याने कितीही पैसे कमवले तरी मी माझे काम सोडणार नाही. माझा मुलगा 80 लाख रुपयांना पंजाब संघात सामील झाला असला तरी आजही मला 70 रुपयांना केस कापायला मिळतात आणि 50 रुपयांत दाढी करायला मिळते. मला आयुष्यभर माझा साधेपणा जपायचा आहे. मला सामान्य माणसासारखे जगायचे आहे.
रामपाल सेन म्हणाले की, कुलदीपने वर्षभर घरी क्रिकेट खेळण्याविषयी सांगितले नव्हते. तो शांतपणे शाळा सोडायचा. त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेत अंडर-19 साठी निवड झाली तेव्हा त्याने घरी सांगितले. ही गोष्ट आम्हा सर्वांना अचानक सांगितल्यावर आम्ही आश्चर्यचकित झालो. त्याचवेळी त्याचा क्रिकेटकडे असलेला कल आम्हाला कळला.
500 रुपये मागितल्याने वडिलांनी खडसावले
रामपाल सांगतात की, कुलदीपला खेळण्यासाठी रीवा ते सिंगरौली येथे जावे लागे. तो माझ्याशी थेट येऊन बोलला नाही. त्याने आईला सांगितले की, मला सिंगरौलीला मॅच खेळायला जायचे आहे, वडिलांकडून 500 रुपये घे. माझे केस कापण्याचे छोटेसे दुकान होते. एका दिवसात 500 रुपये कमाई शक्य नाही. प्रत्येक रुपयाला खूप महत्त्व होते. मला वाटलं आपण त्याला शाळेत पाठवायला शिकायला पण तो अभ्यास करण्याऐवजी खेळण्यात वेळ घालवतोय. वर, खेळात पैसेही वाया जातील, यानंतर मी त्याला खडसावले.
फलंदाज व्हायचे होते, वेगवान गोलंदाज बनले
कुलदीप त्याचे प्रशिक्षक आर्यल अँथनी यांच्याकडून फलंदाजी शिकण्यासाठी गेला होता पण आर्यल यांनी सल्ला दिला की तू गोलंदाजी कर. प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार त्याने गोलंदाजी सुरू केली आणि त्यात तो पारंगत झाला. प्रशिक्षकाने सांगितले की, कुलदीप गरीब कुटुंबातून आला आहे. या कारणास्तव फी घेतली नाही. चेन्नई सुपर किंग्जने कुलदीप सेनला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी बोली लावली होती पण पंजाब किंग्सने त्यापेक्षा मोठी बोली लावली. याआधी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना कुलदीपने चमकदार कामगिरी केली होती.
2018 मध्ये रणजीपासून सुरुवात केली
कुलदीप सेन ताशी 140 किमी वेगाने गोलंदाजी करण्यात पटाईत आहे. त्याच्या उंचीमुळे आणि वेगवान गोलंदाज असल्यामुळे तो मैदानात चर्चेचा विषय राहतो. कुलदीपने डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध भारताकडून वनडे पदार्पण केले. त्याला रेवांचल एक्सप्रेस असेही म्हणतात. उजव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज कुलदीप सेनचा जन्म 28 ऑक्टोबर 1996 रोजी रीवा जिल्ह्यातील हरिहरपूर गावात झाला. वयाच्या 13व्या वर्षी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. रीवा विभागाचे प्रशिक्षक आर्यल अँथनी यांच्या मार्गदर्शनाखाली कुलदीपने आपल्या गोलंदाजी कौशल्याला धार दिली. विभागीय सामन्यांमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला नोव्हेंबर 2018 मध्ये मध्य प्रदेशच्या रणजी संघात स्थान मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
