दारुड्याचा कारनामा! भर चौकात बसची चावी काढून निघून गेला, वाहनांच्या लांबच लांब रांगा
Aurangabad News : वर्दळीच्या ठिकाण आणि त्यात संध्याकाळची वेळ असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
Aurangabad News : औरंगाबाद (Aurangabad) शहरात गेल्या काही दिवसांत नशेखोरांचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे याचा परिणाम शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पाहायला मिळत आहे. दरम्यान, एका दारुड्याच्या कारनामा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, नशेत तर्र असलेल्या एका व्यक्तीने, स्मार्ट बसच्या चालकाला चाकू दाखवत चक्क बसची चावी काढून पळ काढला. औरंगपुऱ्याहून सिडको बस स्थानकाकडे येताना जैस्वाल हॉल जवळ ही घटना घडली. तर, वर्दळीच्या ठिकाण आणि त्यात संध्याकाळची वेळ असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. शेवटी वरिष्ठ पोलिसांनी धाव घेतली. परिसरात असलेल्या अनेकांच्या वाहनाच्या चाव्या लावून पाहण्यात आल्या. शेवटी एका चावीने बस सुरु झाली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अधिक माहिती अशी की, रूट नंबर 44 वर स्मार्ट सिटीची (एमएच 20 सीएल 2807 ) सिडको बस स्थानक ते औरंगपुरा या मार्गावर ही बस चालते. शुक्रवारी सायंकाळी औरंगपुरा येथून ही बस सिडको बस स्थानकाकडे निघाली होती. दरम्यान, जाधववाडी परिसरातील जैस्वाल हॉल जवळ ही बस पोहोचली. याचवेळी नशेत तर्र असलेला एक व्यक्ती बसचे चालक किसन विठ्ठलसिंग चव्हाण यांच्याकडे आला आणि आपल्याला धक्का लागल्याचा सांगू लागला. त्यानंतर त्या व्यक्तीने चव्हाण यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही कळण्याच्या आतच बसचा दरवाजा उघडून त्या व्यक्तीने चाकू दाखवला. त्यामुळे घाबरलेले चव्हाण पाठीमागे सरकले. एवढ्यात त्या व्यक्तीने बसची चावी काढून धूम ठोकली.
ही घटना लक्षात आल्यावर परिसरातील काही पोलीस कर्मचाऱ्यांसह चव्हाण यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तोवर तो व्यक्ती निघून गेला होता. वर्दळीच्या वेळी परिसरात आधीच वाहतूक कोंडी त्यात चावी नेल्याने बस रस्त्यात उभी असल्याने आणखी भर पडली. पाहता-पाहता वाहतूक कोंडी सुरु झाली. बस सुरु करण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या वाहनाच्या चाव्या वापरून पाहण्यात आल्या, मात्र, बस काही सुरु झाली नाही. शेवटी परिसरातील एका नागरिकाची चावी बसला मॅच झाली आणि तिचा वापर करून बस रस्त्यातून बाजूला घेण्यात आली.त्यामुळे शेवटी वाहतूक कोंडी सुटली.
नागरिकांना नाहक त्रास...
एका दारुड्यामुळे स्मार्ट सिटी बस व्यवस्थापनातील कर्मचारी, पोलीस अधिकारी- कर्मचारी अशी यंत्रणा कामाला लागली होती. भर चौकात बस उभी राहिल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. सोबतच वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागला.
इतर महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! क्लाससाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट; औरंगाबादमधील घटना