(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? याकडे अवघ्या राज्यभराचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीनगर : दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह महायुतीची बैठक पार पडली. या बठ्कीत देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी अमित शाह यांनी चर्चा केली. यात देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती असल्याची माहिती मिळत आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? याकडे अवघ्या राज्यभराचे लक्ष लागले आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी शपथविधीचा मुहूर्तच सांगितला आहे. तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींवरही संजय शिरसाट यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय.
संजय शिरसाट म्हणाले की, अमित शाह साहेब जोपर्यंत घोषणा करत नाही, तोपर्यंत कोणाचे नाव फायनल आहे असे समजण्याचे काही कारण नाही. मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्न आम्हालाही आहे. परंतु महायुतीचा जो उमेदवार जाहीर होईल, त्याचं आम्ही निश्चित स्वागत करणार आहोत. आमच्यात कुठलाही संभ्रम नाही. फक्त निर्णय हा वरिष्ठांकडे सोपवल्यामुळे ते घोषणा करतील तेव्हा मुख्यमंत्री कोण हे जाहीर होईल, असे त्यांनी म्हटले.
आमची कुठलीही डिमांड नाही
तुमच्या पक्षाला अजूनही अपेक्षा आहेत का की एकनाथ शिंदेंना सीएम पण मिळेल? याबाबत विचारले असता संजय शिरसाठ म्हणाले की, एकनाथ शिंदे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माला कुठेही अडचण नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे आता निर्णय वरिष्ठांनी घ्यायचा आहे. आम्ही कुठल्याही गोष्टीवर अडून बसलेलो नाही. आमची कुठलीही डिमांड नाही. जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंनी केंद्रात जाऊ नये
केंद्रात मंत्री पद घेण्यापेक्षा राज्यात उपमुख्यमंत्री पद घ्यावं अशी विनंती शिवसेनेच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदेंकडे केल्याची माहिती समोर आली. याबाबत विचारले असता संजय शिरसाठ म्हणाले की, आमचा सर्वांचा आग्रह निश्चितच असेल की एकनाथ शिंदे साहेबांनी केंद्रात जाऊ नये. परंतु कोणते पद स्वीकारावे आणि न स्वीकारावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांच्यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सल्ले देणार नाही, त्यांनी त्यांचा निर्णय स्वतः घ्यावा, असे प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शपथविधी दोन तारखेला होणार
गृहमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये तिढा कायम असल्याचे बोलले जात आहे. यावर संजय शिरसाठ म्हणाले, पहिले मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर होऊ द्या. त्यानंतर मंत्रिमंडळाचे वाटप, कोणते खाते कोणाकडे जाणार? हे निश्चित होईल. तर शपथविधी कधी होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत असता 'शपथविधी दोन तारखेला होणार आहे', असे संजय शिरसाट यांनी जाहीर केले.
संपलेल्या लोकांनी इतरांबद्दल बोलू नये
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना भाजपचे देईल तेच घ्यावे लागेल, अशी टीका केली. यावर बोलताना 'आम्ही काय उभाठा गटाचे लोक आहोत का? आम्ही लढणारे आहोत, जे संपले त्यांनी त्यांची चिंता करावी, आमची चिंता करू नका. आम्ही ठामपणे उभे आहोत. आम्ही लाचारी पत्करलेली नाही. ज्यांनी लाचारी पत्करली त्यांचे हाल आपण पाहत आहोत. संपलेल्या लोकांनी इतरांबद्दल बोलू नये, असा टोला त्यांनी यावेळी संजय राऊत यांना लगावला.
आणखी वाचा